ध्यास विज्ञान प्रसाराचा...

By admin | Published: February 12, 2017 12:47 AM2017-02-12T00:47:42+5:302017-02-12T00:47:42+5:30

शासनाने आजवर छापलेल्या परिभाषा कोशात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित, साहित्य समीक्षा, यंत्र अभियांत्रिकीशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, भाषाविज्ञान

Presence Science ... | ध्यास विज्ञान प्रसाराचा...

ध्यास विज्ञान प्रसाराचा...

Next

- अ. पां. देशपांडे

शासनाने आजवर छापलेल्या परिभाषा कोशात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित, साहित्य समीक्षा, यंत्र अभियांत्रिकीशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, भाषाविज्ञान व वाङ्मयविद्या, तत्त्वज्ञान व तर्कशास्त्र, समाजशास्त्र, औषधशास्त्र, मानसशास्त्र, धातुशास्त्र, संख्याशास्त्र, ग्रंथालयशास्त्र, कृषिशास्त्र, वृत्तपत्रविद्या, वाणिज्यशास्त्र, भूगोलशास्त्र, शारीरक्रियाशास्त्र, व्यवसाय व व्यवस्थापनशास्त्र, भूशास्त्र, विद्युत अभियांत्रिकीशास्त्र, शिक्षणशास्त्र, स्थापत्य अभियांत्रिकीशास्त्र, न्यायवैद्यक व विषशास्त्र आणि शरीर परिभाषाशास्त्र यांचा समावेश आहे.

१९५७ साली रशियाने अवकाशात स्पुटनिक उडवला. १९६२ साली चीनने भारतावर आक्रमण केले. १९६५ साली भारत-पाकिस्तान युद्ध झाले, १९६५पासून भारतात हरित क्रांती सुरू झाली. या प्रत्येक घटनेच्या वेळी लोक विचारत, हे काय चालले आहे, कशासाठी, याचा आम जनतेला काय फायदा आणि धोका? पण हे लोकांना समजून सांगण्यासाठी त्या वेळी विज्ञान संस्था नव्हत्या. त्या वेळी समाजात होत्या साहित्य संस्था, गायनशाळा, इतिहास मंडळे आणि क्रीडा संस्था. पण विज्ञानातल्या या प्रश्नांची उत्तरे यापैकी कोणी देऊ शकत नव्हते. ही परिस्थिती केवळ महाराष्ट्रात होती असे नसून ती भारतभर सगळ्या राज्यांत होती आणि याच दशकात भारताच्या सर्व राज्यांत त्या त्या राज्यांच्या विज्ञान परिषदा स्थापन झाल्या. अपवाद एकच आणि तो म्हणजे १९१४ साली अलाहाबादला सुरू झालेली हिंदी विज्ञान परिषद. या संस्थेने २०१४ साली आपली शताब्दी साजरी केली. बाकी राज्यांत सुरू झालेल्या परिषदांत केरळ शास्त्र साहित्य परिषदेची स्थापना १९६४ साली झाली तर मराठी विज्ञान परिषदेची स्थापना १९६६ साली झाली. या दोन्ही राज्यांतील विज्ञान परिषदांनी आपापली ५० वर्षे पूर्ण केली. त्यानंतर कर्नाटक राज्य विज्ञान परिषद, दिल्ली सायन्स फोरम, पश्चिम बंग विज्ञान परिषद अशा संस्था सुरू झाल्या. या संस्थांनी गेल्या ५०
वर्षांत केलेल्या विज्ञानप्रसारामुळे आता भारतात, विशेषत: महाराष्ट्रात मराठीतून लिखाण करू शकणारे, भाषणे देऊ शकणारे, विद्यार्थ्यांना प्रयोग करून दाखवणारे तज्ज्ञ मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाले आहेत.
महाराष्ट्र राज्याची स्थापना १९६० साली झाल्यावर पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी ज्या ज्या गोष्टी केल्या, त्यात महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची आणि भाषा संचालनालयाची स्थापना झाली. त्या वेळी विश्वकोश मंडळ हे साहित्य आणि संस्कृती मंडळाचाच एक भाग होता आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी त्याचे अध्यक्ष होते. १९६७ साली महाराष्ट्रातल्या विद्यापीठांनी (त्या वेळी मुंबई, पुणे, एस.एन.डी.टी., नागपूर आणि कोल्हापूर एवढीच विद्यापीठे होती. आता त्यांची संख्या तेरा झाली आहे.) आणि मराठी विज्ञान परिषदेने महाराष्ट्र शासनाला मराठीतून परिभाषा कोश निर्माण करण्यासाठी विनंती केली होती. त्याला अनुसरून भाषा संचालनालयाने कोल्हापूरला ‘प्रमाण परिभाषा’ या विषयावर एक बैठक आयोजित करून परिभाषा समित्या निर्माण केल्या. पहिल्या प्रथम भौतिकी व नंतर रसायन शास्त्रासाठी समित्या नेमल्या गेल्या आणि त्याचे अध्यक्षपद तेव्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्राचार्य गो.रा. परांजपे यांना देण्यात आले होते.
या समित्यांवर प्रत्येक विद्यापीठाचा त्या त्या विषयातील एकेक प्राध्यापक असे. मराठी विज्ञान परिषदेनेही अशीच मागणी केल्याने या सर्व समित्यांवर इतर विद्यापीठांच्या बरोबरीने मराठी विज्ञान परिषदेलाही स्थान देण्यात आले होते. शिवाय इंग्रजीतील संज्ञांना अनुरूप मराठी शब्द बनवणे सोयीचे जावे यासाठी या समित्यांवर एकेक संस्कृत तज्ज्ञाचीही नेमणूक केलेली असे आणि ही प्रथा आजही सुरू आहे.
गेल्या वर्षी काही नवीन विषयांवर अथवा जुन्या कोशांची नवीन आवृत्ती काढण्याच्या निमित्ताने स्थापन झालेल्या समित्यांवरही अशीच तरतूद केलेली आहे. आजवर भाषा संचालनालयाने २८ कोश प्रकाशित केले असून काही कोशांच्या दुसऱ्या आवृत्त्याही प्रकाशित झाल्या आहेत. आताही योग, आपत्कालीन परिस्थिती, संगणकशास्त्र, अब्जांशशास्त्र इत्यादी नवनवीन विषयांवर तर अर्थशास्त्र, तत्त्वज्ञान आणि तर्कशास्त्र, शिक्षणशास्त्र अशा विषयांच्या नवीन आवृत्या तयार करण्याचे काम चालू आहे. या कोशात छापलेल्या संज्ञा शालेय पाठ्यपुस्तकात वापरल्या जाव्यात असे शासनाने सुचवल्याने गेली ३०-४० वर्षे ही मराठीत सिद्ध झालेली परिभाषा पाठ्यपुस्तकात वापरली जात आहे. ही परिभाषा वर्तमानपत्रात व वक्त्यांनी भाषणातही वापरावी अशी शासनाची विनंती आहे.

-  apd1942@gmail.com

Web Title: Presence Science ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.