सध्याचे शासन शेतकरी विरोधी - अजित पवार यांचा आरोप
By admin | Published: October 10, 2016 08:09 PM2016-10-10T20:09:17+5:302016-10-10T20:09:17+5:30
डाळीचे भाव वाढत नाही, त्यातच शासनाने डाळ आयात करुन डाळीचे भाव पाडले. कांद्याला पाच रुपये किलोचा सुद्धा भाव मिळेना, टोमॅटो, मिरची मातीमोल भावाने विकण्याची
ऑनलाइन लोकमत
सिंदखेडराजा, दि. 10 - डाळीचे भाव वाढत नाही, त्यातच शासनाने डाळ आयात करुन डाळीचे भाव पाडले. कांद्याला पाच रुपये किलोचा सुद्धा भाव मिळेना, टोमॅटो, मिरची मातीमोल भावाने विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
भाजपा-शिवसेनेच्या नेत्यांनी कच शेती केली नाही, त्यांना शेतीची जाण नाही. तसेच हे शासन उद्योगधार्जिणे असून, शेतीविरोधी असल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी सिंदखेड राजा येथे केला.
स्थानिक पंचायत समितीच्या प्रांगणावर १० आॅक्टोबर रोजी सहकार महर्षी कै.भास्करराव शिंगणे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजीत शेतकरी मेळावा, कृषी प्रदर्शन व प्रगतशील शेतकऱ्यांच्या सत्कार समारंभाप्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी माजी मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून माजी मंत्री राजेश टोपे यांची
उपस्थिती होती. फळबाग, नेटशेड, सेंद्रीय शेती, दुध, सिताफळ, आधुनिक तंत्रज्ञान पद्धतीचा वापर करुन उत्पादन काढणाऱ्या प्रगतशील शेतकऱ्यांचा स्मृतीचिन्ह व शाल, श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान यावेळी सत्कार करण्यात आला.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, की सध्या दुधाला १८ रुपये भाव तर पाण्याची बाटली २० रुपयाला मिळते. शेतकरी शेतमजुराला बँकेत खाते काढायला लावले. १५ लाख एका खात्यात जमा करण्याची घोषणा फोल ठरली. सरकार बुलेट
ट्रेनवर हजारो कोटी रुपये खर्च करणार आहे, तोच पैसा देशभरातील रेल्वेसाठी खर्च केला तर जनतेला चांगली सुविधा मिळेल. मागच्या काळात उद्योगधंद्यात महाराष्ट्र एक नंबरवर होता. तो आता तिसऱ्या क्रमांकावर गेला. आमच्या काळात
सर्व सामाजिक घटकांना मंत्री पद दिली गेली. मात्र आता मुंबईमध्येच मंत्री पदाची खैरात वाटली जात आहे. अॅट्रासिटीचा गैरवापर टाळावा, समाजासमाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम सध्याचे शासन करीत आहे. सध्या महिला, मुलीवर अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. सकल मराठा समाज, धनगर समाज, ओबीसी, एस. सी., एस.टी.मध्ये अंसतोष भडकत असून, लाखो जनसमुदायांचे मूक मोर्चे निघत आहेत. याची शासनाला खंत वाटत नाही. शासन सर्व स्तरावर अपयशी
ठरले आहे, असे हे असंवेदनशील सरकार किती काळ ठेवायचे याचा विचार करा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकासाठी कामाला लागा, असे आवाहन अजित पवार यांनी केले.
यावेळी शेती तज्ज्ञ भगवानराव कापसे, सिताफळ तज्ज्ञ नारायण महानोर यांनी मार्गदर्शन केले. पारंपारिक शेतीऐवजी गट शेती, फळबाग लागवड करुन विकास साधावा, असे आवाहन त्यांनी केले. राजेश टोपे यांनी मागेल त्याला शेततळे, पन्नीसहीत शंभर टक्के अनुदानावर शासनाने उपलब्ध करुन देण्याची मागणी केली. डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी जिल्हा बँक सुरु झाल्याबद्दल समाधान
व्यक्त केले. तसेच साखर कारखाना सुतगिरणीला लागलेली घरघर बंद झाली असून, लवकरच सुतगिरणी सुरु होणार असल्याची माहिती दिली.