सध्याचे सरकार कोल्हापुरात! शरद पवारांचा टोला, कर्जमाफी घेतलेला शेतकरी दाखवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 05:00 AM2017-08-21T05:00:11+5:302017-08-21T05:01:25+5:30
आजवर सरकारमधील निर्णय घेण्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांना असत; पण हल्ली भाजपा सरकारचे सर्व निर्णय कोल्हापुरातून होतात. पक्षात कोणाला घ्यायचे, मंत्रिपद कोणाला द्यायचे हे निर्णयही इथेच होतात. सत्तेच्या विकेंद्रीकरणाचा हा प्रगोग चांगला आहे, असा मार्मिक टोला राष्टÑवादीचे नेते शरद पवार यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना लागावला.
कोल्हापूर : आजवर सरकारमधील निर्णय घेण्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांना असत; पण हल्ली भाजपा सरकारचे सर्व निर्णय कोल्हापुरातून होतात. पक्षात कोणाला घ्यायचे, मंत्रिपद कोणाला द्यायचे हे निर्णयही इथेच होतात. सत्तेच्या विकेंद्रीकरणाचा हा प्रगोग चांगला आहे, असा मार्मिक टोला राष्टÑवादीचे नेते शरद पवार यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना लागावला.
शेकापचे ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी पवार कोल्हापुरात आले होते. पत्रकारांशी बोलताना त्यांनी कर्जमाफीपासून नारायण राणे यांच्या संभाव्य भाजपप्रवेशावर भाष्य केले. ते म्हणाले, सध्या भाजपामध्ये ‘ न खाऊंगा न खाने दुँगा’ ही परिस्थिती राहिलेली नाही. त्यामुळे राणे यांना माझ्या शुभेच्छा आहेत.
सध्या राज्यातील फडणवीस सरकारमध्ये गंमतच सुरू आहे. मुख्यमंत्र्यांऐवजी चंद्रकात पाटील हेच काहींना मंत्रिपदे वाटप करत सुटले आहेत. कोल्हापूरच्यादृष्टीने हे मोठेपण आहे, असा टोलाही पवार यांनी लागवला.
कर्जमाफीबाबत बोलताना पवार म्हणाले, मुख्यमंत्री फडणवीस यांनी कर्जमाफीची घोषणा केली. त्याचा दिंडोराही संपूर्ण राज्यभर पिटला जात आहे; पण कर्जमाफीचे निकषच काय आहेत हे मलाही माहीत नाहीत.
पुढे पवार म्हणाले, शेतकºयांच्या मालाला हमीभाव निश्चित नाही, त्यात हवामानावर शेतकºयांचे पीक अवलंबून असते, त्यामुळे शेतकरी नेहमीच अडचणीत येतो म्हणूनच शेतकºयाला कर्जमाफी आवश्यक असल्याचा पुनरुच्चार पवार यांनी केला.
सरकारवर विश्वास कसा बसणार ?
मंत्री प्रकाश मेहता आणि सुभाष देसाई यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होऊनही त्यांनी अद्याप राजीनामे दिलेले नाहीत; या भ्रष्टाचाराच्या प्रश्नाकडे जोपर्यंत गांभीर्याने पाहिले जात नाही, तोपर्यंत सामान्य लोकांना विश्वास सरकारवर बसणार नसल्याचेही पवार म्हणाले.
सदाभाऊंचे काय योगदान : खासदार राजू शेट्टी यांचे संसदेतील काम चांगले आहे, पण दुसºयाचे काय योगदान आहे? ते फक्त मीडियातच दिसतात, असा टोला मंत्री सदाभाऊ खोत यांना लगावला.
पाटील यांच्या प्रकृतीची पवार यांनी केली चौकशी
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : राष्टÑवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी येथे ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. पवार यांच्या बहीण व पाटील यांच्या पत्नी सरोज पाटील (माई) यावेळी उपस्थित होत्या. प्रा. पाटील यांची प्रकृती बरी नसल्यामुळे ते काही दिवसांपासून घरीच विश्रांती घेत आहेत.
घरातून बाहेर पडताना पवार यांनी आपली बहीण सरोज पाटील यांना हाक देत ‘मी जातो गं ’ असे म्हटले.
गडबडीत सरोज पाटील यांनी दुरूनच ‘हा जावा-जावा’ असा हाकेला प्रतिसाद दिला. दरवाजातून बाहेर जाणारे पवार थांबले व मागे फिरले आणि ‘अगं, या म्हण की, तू जा कुठं म्हणतेय’ असे ते मिश्किलपणे म्हणाले. त्यावर पाटील या तातडीने पुढे आल्या अन् त्यांनी हसतच, ‘अरे तसे नव्हे, येत जा’ असे प्रेमाने सांगितले.