वर्तमानात जगा - उद्धव
By Admin | Published: June 19, 2016 03:29 AM2016-06-19T03:29:41+5:302016-06-19T03:29:41+5:30
मराठी माणसाच्या मनात आग पेटविण्याचे काम शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केले. कारण शिवसेना हा नुसता पक्ष नाही. तर मराठी माणसाच्या मनातील आग आहे. त्यामुळे उद्या
मुंबई : मराठी माणसाच्या मनात आग पेटविण्याचे काम शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केले. कारण शिवसेना हा नुसता पक्ष नाही. तर मराठी माणसाच्या मनातील आग आहे. त्यामुळे उद्या काय होणार? याचा विचार करु नका. भुतकाळात रमु नका. वर्तमानात जगा आणि संकटाच्या छाताडावर नाचत पुढे जाण्याचा आत्मविश्वास ठेवा. तो असेल तर शिवसेनाच काय, मराठी माणुस आणि महाराष्ट्राचे कुणीही काहीही वाकडे करु शकणार नाही, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.
डॉ. विजय ढवळे यांच्या ‘वाघाचे पंजे’ या पुस्तकाचे प्रकाशन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अंधेरी येथील हॉटेल कोहिनूर कॉन्टिनेटलमध्ये शनिवारी करण्यात आले; यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी उद्योगमंत्री सुभाष देसाई, खासदार संजय राऊत, ज्येष्ठ नेते मनोहर जोशी, लिलाधर डाके, अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर, महापौर स्नेहल आंबेकर, नवचैतन्य प्रकाशनचे शरद मराठे आदी मान्यवर उपस्थित होते.
उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवसेनेला पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत, असे वाटत नाही. सर्व गोष्टी कालपरवा घडल्यासारखे वाटते. पन्नास वर्षांपूर्वी प्रबोधनकार ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुखांना
बोलावले आणि काही संघटना किंवा पक्ष काढण्याचा विचार आहे की नाही? असा सवालही केला. त्यानंतर तात्काळ शिवसेना या नावाने संघटना काढण्याचे सूचवत शिवसेना स्थापनेचा नारळ घरातच फोडला. या घटनेचा मी साक्षीदार आहे.
विजय ढवळे म्हणाले की, शिवसेना हा माझा ध्यास आणि श्वास आहे. त्यामुळेच हे पुस्तक मी लिहू शकलो. शिवसेनेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त योगदान
देण्याची इच्छा होती. त्यासाठी मी १ हजार २०० तास दिले आणि पुस्तकाच्या निमित्ताने कॅनडातून मुंबईत आलो.
हे पुस्तक लिहिताना झपाटुन गेलो होतो. ते मंतरलेले दिवस होते. ते दिवस मी पुन्हा जगलो. कॅनडात जाण्याआधी शिवसेनाप्रमुखांनी मला मोठा हो; पण शिवसेनेला विसरू नको, असे सांगितले होते. हा आदेश मी तंतोतंत पाळला. (प्रतिनिधी)
‘वाघाचे पंजे’ स्पॅनिशमध्येही येणार...
शिवसेनाप्रमुखांचे फटकारे आणि वाघाचे पंजे या पुस्तकांमध्ये साम्य आहे. वाघाचे पंजे हे वाघाचे शस्त्र असतात. त्यामुळे कोणी सहसा वाघाच्या वाटेला जात नाही. जर गेला तर एका पंजात तो सपाट होतो. हे पुस्तक जगातील दुसऱ्या क्रमांकाची भाषा असलेल्या स्पॅनिश भाषेतही येणार आहे.
शिवसेनेत राहून प्रत्यक्ष अनुभव घेतलेल्या शिवसैनिकाने लिहिलेले हे पुस्तक सर्वात वेगळे आहे. शिवसेनेवर बहुतेक पुस्तके आली. पण शिवसेनेत राहून आणि प्रत्यक्ष अनुभव घेतलेल्या शिवसैनिकाने लिहिलेले हे पुस्तक वेगळे असल्याचे उद्धव ठाकरे यांनी या वेळी सांगितले.