गोविंद पानसरे स्मारक आराखड्याचे सादरीकरण

By admin | Published: November 8, 2016 10:12 PM2016-11-08T22:12:43+5:302016-11-08T22:12:43+5:30

येथील वि. स. खांडेकर शाळा, शास्त्रीनगर येथे उभारण्यात येत असलेल्या ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या नियोजित स्मारकाच्या आराखड्याचे सादरीकरण मंगळवारी

Presentation of Govind Pansare Memorial Plan | गोविंद पानसरे स्मारक आराखड्याचे सादरीकरण

गोविंद पानसरे स्मारक आराखड्याचे सादरीकरण

Next
>ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. 08 - येथील वि. स. खांडेकर शाळा, शास्त्रीनगर येथे उभारण्यात येत असलेल्या ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या नियोजित स्मारकाच्या आराखड्याचे सादरीकरण मंगळवारी आर्किटेक्ट राजेंद्र सावंत यांनी महापालिकेच्या ताराराणी सभागृहात केले. पानसरे यांचे स्मारक सामाजिक व राजकीय चळवळींतील कार्यकर्त्यांना प्रेरणादायी ठरेल, अशा पद्धतीने उभारण्यात येत असून, त्यासाठी आणखी निधी लागला, तर तो उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही यावेळी महापौर अश्विनी रामाणे यांनी दिली. 
महानगरपालिकेच्यावतीने स्मारकासाठी ३० बाय ३५ फुटांची जागा, तसेच निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या स्मारकाचा आराखडा विना मोबदला तयार करण्याची जबाबदारी आर्किटेक्ट राजेंद्र सावंत यांनी स्वीकारली. त्यांनीच मंगळवारी स्मारकाच्या आराखड्याचे चित्रफितीद्वारे सादरीकरण केले. 
यामध्ये १५ बाय २१ फुटांमध्ये शिल्पाची रचना करण्यात येईल. शिल्पाच्या दोन्ही बाजूने मोकळी जागा, लॅण्डस्केपिंग करून सुशोभिकरण, पिलरची रचना पेनच्या आकारात ठेवण्यात आली आहे. त्यामध्ये छोट्या लॉनची रचना, लाईट इफेक्ट, आदींचा समावेश आहे. आराखड्यामध्ये स्मारक तिन्ही बाजूने पाहता येईल, असे नियोजन केले असल्याचे सांगितले. बांधकाम संपूर्ण जर्मन टेक्नॉलॉजीमध्ये आर्किटेक्चरल काँक्रिटमध्ये करण्यात येणार असून, काँक्रिट रंगमिश्रित असल्याने वेगळा रंग देण्याची आवश्यकता भासणार नाही. स्मारकासाठी २१ लाख खर्च अपेक्षित आहे.  रस्त्यापासून १५ फूट उंचीचे शिल्प असेल. यामध्ये कॉ. पानसरे यांनी आजवर केलेल्या त्यांच्या संघर्षमय कार्याची जाणीव पुढच्या पिढीला व्हावी, अशी रचना केल्याचे सांगून, या तिन्ही शिल्पांमध्ये कोणत्या बाबींचा समावेश करावा, याबाबत सूचना मांडव्यात, असे सांगितले.
यावेळी स्मिता पानसरे यांनी तरुण पिढीला पुरोगामी विचारांची माहिती मिळावी म्हणून तेथे अभ्यासिका असावी, अशी सूचना केली. सतीश कांबळे यांनी स्मारकाच्या ठिकाणी असलेला महावितरणचा ट्रान्सफॉर्मर हलविण्यात यावा, अशी मागणी केली.  नगरसेवक भूपाल शेटे, अशोक जाधव, मेधा पानसरे, चंद्रकांत यादव, माजी महापौर आर. के. पोवार, दिलीप पोवार, आदींनी सूचना मांडल्या.
    महापौर अश्विनी रामाणे यांनी स्मारक कमिटीच्या सूचनांचा समावेश करून स्मारकांचा अंतिम आराखडा लवकरात लवकर सादर करून स्मारक चांगले व लवकर करावे, अशी सूचना केली.

Web Title: Presentation of Govind Pansare Memorial Plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.