राजन व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित

By admin | Published: January 8, 2016 02:47 AM2016-01-08T02:47:40+5:302016-01-08T02:47:40+5:30

वरिष्ठ पत्रकार जे. डे यांच्या हत्येप्रकरणी कुख्यात डॉन छोटा राजनला तिहार कारागृहातून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मुंबईच्या विशेष मोक्का न्यायालयापुढे हजर करण्यात आले

Presented by Rajan Video Conference | राजन व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित

राजन व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित

Next

मुंबई : वरिष्ठ पत्रकार जे. डे यांच्या हत्येप्रकरणी कुख्यात डॉन छोटा राजनला तिहार कारागृहातून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मुंबईच्या विशेष मोक्का न्यायालयापुढे हजर करण्यात आले. त्याच्यावर १९ जानेवारी रोजी आरोप निश्चित करण्यात येतील, असे विशेष न्यायालयाने म्हटले.
विशेष न्या. ए.एल. पानसरे यांनी २२ डिसेंबर रोजी जे. डे हत्येप्रकरणाच्या खटल्यात छोटा राजनविरुद्ध वॉरंट काढले होते. त्याला गुरुवारी न्यायालयात हजर करण्याचा आदेश दिल्ली पोलिसांना दिला होता. त्यानुसार छोटा राजनला व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे विशेष न्यायालयात हजर करण्यात आले.
‘न्यायाधीशांनी छोटा राजनला पुढील सुनावणी १९ जानेवारीला असल्याचे सांगितले. तसेच त्या दिवशी त्याच्यावर आरोप निश्चित करणार असल्याचेही त्याला सांगितले. त्यावर छोटा राजनने त्याच्याकडे आरोपपत्राची प्रत नसल्याची माहिती न्यायाधीशांना दिली. न्यायाधीशांनी आरोपपत्राची प्रत त्याला देण्याचा आदेश पोलिसांना दिला आहे,’ अशी माहिती सरकारी वकील दिलीप शहा यांनी दिली.
त्याशिवाय राजनने मुंबईला आपला वकील नसल्याची माहिती न्या. पानसरे यांना दिली. त्यावर त्यांनी राजनला वकील नेमण्याची मुभा दिली. गुरुवारी सकाळी सीबीआयने दिल्ली न्यायालयाचा आदेश विशेष मोक्का न्यायालयाला दाखवला. या आदेशानुसार दिल्ली न्यायालयाने तिहार कारागृह प्रशासनाला आदेश देत छोटा राजनला मुंबई न्यायालयात व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे हजर करण्यास सांगितले.
‘छोटा राजनने मुंबईत त्याच्या जिवाला धोका असल्याने मुंबई न्यायालयापुढे हजर करण्यात येऊ नये, यासाठी दिल्ली न्यायालयात अर्ज केला. त्या अर्जावर दिल्ली न्यायालयाने त्याला व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे हजर करण्याचा आदेश तिहार कारागृहाला दिला,’ अशी माहिती सीबीआयच्या अधिकाऱ्याने दिली. तसेच या अधिकाऱ्याने जे. डे हत्याप्रकरणात अधिक तपास करण्याची परवानगी न्यायालयाकडून मागितली; अािण न्यायालयाने ती मान्यही केली. ‘मुंबई उच्च न्यायालयाने ही केस जलदगतीने निकाली लावण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे आदेशात दुरुस्ती करण्यासाठी पुन्हा उच्च न्यायालयात जाणे योग्य नाही,’ असे न्या. पानसरे यांनी म्हटले. (प्रतिनिधी)
न्या. पानसरे यांनी छोटा राजनला त्याचे नाव विचारले. त्यावर राजनने मराठीतून आपले नाव राजन सदाशिव निकाळजे असल्याचे न्यायाधीशांना सांगितले.
न्यायाधीश आणि राजन यांच्यामधील संपूर्ण संभाषण मराठीतूनच सुरू होते.
न्यायाधीशांनी त्याला जे. डे हत्येची केस समजावून सांगत १९ जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी ठोठावली.

Web Title: Presented by Rajan Video Conference

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.