एफटीआयआयप्रकरणी चित्रकर्मींची राष्ट्रपतींना साद
By Admin | Published: September 11, 2015 04:08 AM2015-09-11T04:08:08+5:302015-09-11T04:08:08+5:30
तब्बल तीन महिने उलटूनही फिल्म टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडियामधील (एफटीआयआय) आंदोलनावर काहीच तोडगा निघालेला नाही. त्यामुळे यात हस्तक्षेप करण्याची विनंती आता
पुणे : तब्बल तीन महिने उलटूनही फिल्म टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडियामधील (एफटीआयआय) आंदोलनावर काहीच तोडगा निघालेला नाही. त्यामुळे यात हस्तक्षेप करण्याची विनंती आता राष्ट्रीय पुरस्कार विजेते १९० कलाकार आणि दिग्दर्शकांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना केली आहे. यासंदर्भात राष्ट्रपतींना पाठविलेल्या पत्रात या संस्थेला स्वायत्ततेचा दर्जा व अभिमत विद्यापीठ घोषित करावे, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
राहुल गांधी यांनी यापूर्वी एफटीआयआयला भेट दिल्यानंतर राष्ट्रपतींकडे एफटीआयआयच्या प्रश्नामध्ये हस्तक्षेप करण्याची मागणी केली होती, त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत अदुर गोपालकृष्णन, सईद मिर्झा, संतोष सिवन, रसूल पुकुट्टी, दिवाकर बॅनर्जी, अंजुम राजावली, कुंदन शाह, गिरीश कासारवल्ली, मणिरत्नम, अभिनेत्री विद्या बालन अशा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्या चित्रकर्मींनी देखील राष्ट्रपतींना संयुक्तपणे पत्र लिहिले असल्याची माहिती संस्थेचे आंदोलक विद्यार्थी राकेश शर्मा, विकास अर्स, अमेय गोरे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. आंदोलनाचा गुरुवारी ९१ वा दिवस होता.
३ जुलै रोजी झालेल्या बैठकीनंतर सरकारतर्फे कोणताही संवाद झालेला नाही. तसेच माहिती प्रसारण मंत्रालयाकडून आलेल्या केंद्रीय समितीचा अहवाल देखील २० दिवस झाले तरी अजून प्रस्तुत करण्यात आलेला नाही. यावरुन सरकारचा बेजबाबदारपणा दिसून येतो, असे शर्मा म्हणाला. गुरूवारी एकाचवेळी मुंबई, कोलकाता, त्रिवेंद्रम येथे विविध चित्रपटकर्मींनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत निषेध नोंदविला आहे.