उद्धव ठाकरेंनी दिलं समर्थन, तरीही मुर्मू यांच्यासोबत भेटीचं नाही निमंत्रण!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2022 10:51 AM2022-07-14T10:51:07+5:302022-07-14T10:52:39+5:30
ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला गुरुवारी मुर्मू यांच्या सोबत होणाऱ्या बैठकीसाठी निमंत्रण देण्यात आलेले नाही.
राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर करणाऱ्या शिवसेनेला पुन्हा एक मोठा झटका बसला आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिव सेनेला मुर्मू यांना भेटण्यासाठी निमंत्रणच देण्यात आलेले नाही. मुर्मू गुरुवारी मुंबईमध्ये पोहोचत आहेत. यादरम्यान त्या राज्यातील सर्व आमदार आणि खासदारांना भेटणार आहेत.
ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला गुरुवारी मुर्मू यांच्या सोबत होणाऱ्या बैठकीसाठी निमंत्रण देण्यात आलेले नाही. यासंदर्भात बोलताना ठाकरे गटातील शिवसेनेचे खासदार विनायक राऊत म्हणाले, "आम्हाला अद्यापपर्यंत द्रौपदी मुर्मू यांच्या सोबतच्या बैठकीसंदर्भात भाजप अथवा कुणाकडूनही निमंत्रण मिळालेले नाही. यामुळे गुरुवारी होणाऱ्या बैठकीसाठी शिवसेनेने उपस्थित राहण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्या एक आदिवासी महिला आहेत. यामुळेच प्रक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना पाठिंबा देण्याचे ठरवले आहे, दुसरे काही नाही."
राष्ट्रपती पदाच्या उमेदवार मुर्मू गुरुवारी दुपारी मुंबईत पोहोचणार असल्याचे वृत्त आहे. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, तसेच भारती पवार यांच्यासह इतरही काही नेते असणार आहेत. त्या विमानतळाजवळील एका हॉटेलमध्ये त्यांना पाठिंबा देणाऱ्या खासदार आणि आमदारांची भेट घेणार आहेत. यावेळी सुमारे 250 खासदार आणि आमदार मुर्मू यांना भेटण्याची शक्यता आहे, असे भाजप नेत्यांचे म्हणणे आहे.
विशेष म्हणजे, 19 पैकी 12 खासदारांच्या आवाहनानंतर ठाकरे यांनी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला आहे. विरोधी पक्षांकडून यशवंत सिन्हा हे मुर्मू यांच्या विरोधात उभे आहेत. 18 जुलै रोजी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.
मिळालेल्या वृत्तानुसार, भाजपने आपल्या सर्वच्या सर्व 106 आमदारांना गुरुवारी सकाळपर्यंत मुंबईत पोहोचायला सांगितले आहे. याच बरोबर, एकनाथ शिंदे गटातील शिवसेनेच्या 40 आमदारांसह एकूण 50 आमदार बैठकीत सहभागी होण्यास सांगण्यात आले आहे.