विधानसभा बंद पाडण्याचा डाव अध्यक्षांनी रोखला!

By अतुल कुलकर्णी | Published: July 17, 2018 04:27 AM2018-07-17T04:27:44+5:302018-07-17T04:28:11+5:30

राज्यात शेतकरी संघटनेने दुधाच्या प्रश्नावर तीव्र आंदोलन सुरू केले असताना विरोधकांना या विषयावर सभागृह बंद पाडायचे होते.

The president has stopped the shutdown of the assembly! | विधानसभा बंद पाडण्याचा डाव अध्यक्षांनी रोखला!

विधानसभा बंद पाडण्याचा डाव अध्यक्षांनी रोखला!

Next

नागपूर : राज्यात शेतकरी संघटनेने दुधाच्या प्रश्नावर तीव्र आंदोलन सुरू केले असताना विरोधकांना या विषयावर सभागृह बंद पाडायचे होते. अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या दालनात बैठक झाली त्यावेळी अध्यक्षांनी व स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, कामकाज खूप शिल्लक आहे, १३ विधेयके आहेत, असे सांगत दिवसभर सभागृह बंद करण्यास विरोध केला. शेवटी विरोधकांच्या सरकारच्या भूमिकेचा निषेध करत सभात्यागाचा मार्ग स्वीकारला.
मात्र शिवसेनेचे राज्यमंत्री विजय शिवतारे आणि भाजपाचे आ. योगेश सागर यांनी दूध संघाचे मालक शेतकऱ्यांना हमीभाव मिळू देत नाहीत, त्यांच्या नावावर हे राजकारण करत आहेत, असे आक्षेप घेतले. त्यावर विरोधकांनी भाजपा शिवसेनेचे शेतकरी विरोधी रूप बाहेर पडल्याचा आरोप केला.
शेतकºयांना थेट पाच रुपये अनुदान द्यावे, अशी विरोधकांची मागणी होती. त्यासाठी त्यांनी विधानसभेत विरोधकांनी स्थगन प्रस्ताव मांडला होता. प्रश्नोत्तराचा तास थांबवून हा विषय चर्चेला घ्या, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. त्याला राष्टÑवादीचे नेते अजित पवार, ज्येष्ठ सदस्य गणपतराव देशमुख यांनी पाठिंबा दिला. शिवसेनेतर्फे चंद्रदीप नरके आणि सुनील प्रभू यांनी पाच रुपये अनुदानाची मागणी केली; पण मंत्री शिवतारे यांनी मात्र दूध संघ शेतकºयांना दर देत नाहीत, अशी टीका करत कॉँग्रेस, राष्टÑवादीकडे बोट केले. कारण अनेक दूध संघ हे या दोन पक्षांच्या ताब्यात आहेत. एकीकडे दुधाच्या आंदोलनाला पाठिंबा देत असताना दुसरीकडे सरकार मात्र दूध संघावर खापर फोडतानाचे चित्र सभागृहात होते.
विरोधकांच्या स्थगनवर कोणताही निर्णय न देता अध्यक्षांनी मंत्री महादेव जानकर यांना निवेदन करण्यास सांगितले. जानकर यांनी याआधीच केलेल्या घोषणा पुन्हा नव्याने सांगितल्या. त्यावेळी सभागृहात गोंधळ सुरू झाला. त्यामुळे सभागृह तीनवेळा तहकूब करावे लागले. मात्र शेवटी विरोधकांनी सभात्याग केला आणि पुन्हा कामकाज सुरू झाले.
>भाव वाढवून देण्याची मागणी होत असेल तरी खरेदी संघाने दूध विक्रीचा दर एक रुपयानेही कमी केलेला नाही. गोकुळ १० लाख लिटर दूध गोळा करत आहे. शेतकºयांना सरकार नाही हे दूध संघवालेच लुटत आहेत.
- विजय शिवतारे,
राज्यमंत्री, शिवसेना

शिवसेनेचे आश्चर्य वाटते. सभागृहात शेतकरी प्रश्नावर ते गप्प बसतात. शेतकºयांनी रक्ताचे पाणी करून सहकारी यंत्रणा उभी केली; मात्र दूध संघावर आरोप करताना शिवसेनेच्या मंत्र्यांनी आपण शेतकरी विरोधात बोलत आहोत याचे भान ठेवायला हवे होते. जे दूध संघ नीट चालत नाहीत, त्यांच्यावर कारावाई करा, गुन्हे दाखल करा, पण सरसकट सहकाराला बदनाम करू नका.
- राधाकृष्ण विखे पाटील,
विरोधी पक्षनेते, विधानसभा

शेतकरी दूध स्वत:हून आणून देण्यास तयार आहेत. मात्र दूध संघ दूध घेत नाहीत, तर त्यांचे दूध रस्त्यावर ओतत आहेत. हे आंदोलन शेतकरीविरोधी आहे आणि सरकार ते खपवून घेणार नाही.
- चंद्रकांत पाटील,
महसूल मंत्री

Web Title: The president has stopped the shutdown of the assembly!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :milkदूध