राष्ट्रपतींच्या हस्ते होणार साईसमाधी शताब्दीचा श्रीगणेशा, शिर्डीत आज विमानाची चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 03:10 AM2017-09-26T03:10:15+5:302017-09-26T03:10:37+5:30
विजयादशमीच्या दुस-या दिवशी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ध्वजारोहण करून साईसमाधी शताब्दीचा श्रीगणेशा होणार असल्याची माहिती साई संस्थानचे अध्यक्ष डॉ़ सुरेश हावरे यांनी सोमवारी दिली.
शिर्डी : विजयादशमीच्या दुस-या दिवशी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ध्वजारोहण करून साईसमाधी शताब्दीचा श्रीगणेशा होणार असल्याची माहिती साई संस्थानचे अध्यक्ष डॉ़ सुरेश हावरे यांनी सोमवारी दिली.
लेंडीबागेत उभारलेल्या ५१ फूट उंचीच्या ध्वजस्तंभावर रविवारी १ आॅक्टोबरला सकाळी अकरा वाजता राष्ट्रपती ध्वजारोहण करणार आहेत़ या वेळी राज्यपाल के. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राम शिंदे, गृहराज्यमंत्री रणजित पाटील, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे आदींची प्रमुख उपस्थिती असेल, असे डॉ़ हावरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले़ ध्वजारोहणापूर्वी सकाळी सहा वाजता रथातून ध्वजस्तंभाची प्रतिकृती व साई प्रतिमेची मिरवणूक काढण्यात येणार आहे़
अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मंगळवारी येथे पहिल्या विमानाची चाचणी होत आहे. १ आॅक्टोबरला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते विमानतळाचा लोकार्पण सोहळा अपेक्षित आहे़
पालकमंत्री राम शिंदे शिर्डी पहिले प्रवासी ठरणार आहेत़ जवळपास २७० कोटींचे हे विमानतळ महाराष्ट्र शासनाने विकसित केले आहे. त्यासाठी साईबाबा संस्थानने ५० कोटी रुपये दिले आहेत़ मुंबई, हैदराबाद व दिल्लीसाठी विमान सेवा सुरू होणार आहे़रोज किमान ५०० प्रवासी येतील, असा अंदाज आहे. प्रवाशांना शिर्डीच्या बोर्डिंग पासबरोबरच साईदर्शनाचा व्हीआयपी दर्शन पास देण्यात येणार आहे़