बैलगाडी शर्यत विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2017 05:47 PM2017-07-26T17:47:33+5:302017-07-26T17:56:10+5:30
नवी दिल्ली, दि. 26 - बैलगाडी शर्यत विधेयकावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली असून यामुळे बैलगाडी शर्यतींचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्र शासनाने संमत केलेल्या बैलगाडी शर्यतीच्या विधेयकावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली असल्याने आता कायदेशीर मान्यता मिळाली आहे. यापुढे अटी पाळून बैलगाडी शर्यती आयोजित करता येणार. यासाठी जिल्हाधिका-यांची परवानगी आवश्यक राहणार असून अटी लागू करुन जिल्हाधिकारी परवानगी देतील. महाराष्ट्राचं पशुसंवर्धन खातं यासंबंधी अधिसूचना काढणार आहे.
एप्रिल महिन्यात विधानसभेत प्राण्यांशी कौर्य प्रतिबंध विधेयक कायदा एकमताने मंजूर झाला होता. यानुसार प्राण्यांचे हाल केल्यास 3 वर्षे तुरुंगवास आणि 5 लाख रुपये दंड ठोठावला जाईल. पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांनी हे विधेयक विधानसभेत मांडलं होतं आणि एकमताने मंजूरही झालं होतं. बैलागाड्यांची शर्यत पुन्हा सुरू व्हावी यासाठी शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पाठपुरावा केला होता.
प्राणीप्रेमींनी न्यायालयात धाव घेऊन बैलगाडा शर्यतीवर बंदी आणली होती. त्यानंतर तामीळनाडूच्या जलीकट्टूच्या धर्तीवर राज्यातील बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू करण्यात यावी, अशी अनेक दिवसांपासूनची मागणी होती.
शर्यतीदरम्यान प्राण्यांसंदर्भातील नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी आणि प्राण्यांना यातना होणार नाहीत, याची काळजी घ्यावी लागेल. त्यामुळे आता गावागावांमध्ये पुन्हा एकदा सर्जा-राजाची जोडी शर्यतीत धावताना दिसणार आहे.
बैलगाडी शर्यत बद्दल थोडक्यात माहिती -
- बैलगाडी शर्यत हा खेळ ग्रामीण भागात रुजला आहे. हा खेळ वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारे होतो. सांगली साताऱ्यात चाकोरीतून गाड्या पळवल्या जातात. एका वेळी चार किंवा पाच गाड्या एकाच वेळी पळतात. या शर्यतीत गट, सेमी फायनल आणि फायनल अशा गाड्या पळतात.
- खेड भागात बैलगाडी शर्यतीसाठी घाट बांधले आहेत. घाटातून एकच गाडी पळते. इथे सेकंदावर नंबर दिले जातात. खेडच्या शर्यतीत, सगळ्यात पुढे घोडे, त्यामागे एक गाडी आणि शेवटी शर्यतीची गाडी असते.
-विदर्भात बैलगाडी शर्यतीला शंकरपट म्हणतात. नाशिक जिल्ह्यातील काही गावात गाडीला घोडा आणि बैल जुंपून शर्यती होतात. रायगड जिल्ह्यात तर वाळूच्या रेतीत गाड्या पळवण्याची प्रथा आहे.