शिपाई झाला स्थायी समितीचा अध्यक्ष
By admin | Published: March 6, 2016 01:20 AM2016-03-06T01:20:51+5:302016-03-06T01:20:51+5:30
महापालिकेच्या नगरसचिव विभागामध्ये शिपाई म्हणून काही काळ काम केलेले बाळासाहेब बोडके यांची महापालिकेचा आर्थिक कणा असलेल्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने पालिकेच्या तिजोरीचा चालक
पुणे : महापालिकेच्या नगरसचिव विभागामध्ये शिपाई म्हणून काही काळ काम केलेले बाळासाहेब बोडके यांची महापालिकेचा आर्थिक कणा असलेल्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने पालिकेच्या तिजोरीचा चालक बनण्याचा बहुमान त्यांना प्राप्त झाला आहे. बोडके यांचे वडीलही नगरसचिव कार्यालयात नोकरीला होते; तसेच त्यांच्या मामांनी महापौरांचे जमादार म्हणून काम केले आहे. त्यामुळे पालिकेशी जुना ऋणानुबंध असलेल्या बोडकेंना आजतिथला विश्वस्त बनण्याचा मान मिळाला आहे.
महापालिकेमध्ये शिवाजीनगर भागातून नगरसेवक म्हणून बाळासाहेब बोडके तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. त्यांना पहिल्यांदा मोठ्या पदावर काम करण्याची पक्षाच्या वतीने संधी देण्यात आली आहे. बोडके यांचे वडील काळुराम बोडके नगरसचिव विभागात १९७८ पर्यंत कार्यरत होते. वडिलांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या जागेवर अनुकंपाखाली बाळासाहेब बोडके १९७८ मध्ये पालिकेत नोकरीला लागले. त्यांनी ५ वर्षे शिपाई म्हणून काम केले आहे. त्यांचे मामा कोंडिबा पडळधरे यांनी पालिकेत जमादार म्हणून काम केले आहे.
विजयानंतर आनंद व्यक्त करताना बोडके म्हणाले, की पक्षाच्या नेत्यांनी एका सामान्य कार्यकर्त्याला काम करण्याची संधी दिली आहे. त्याचे सोने करण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. शहरातील कचरासमस्या सोडवून शहर कचरामुक्त करण्यावर माझा भर राहील. त्याचबरोबर स्मार्ट सिटी योजना, २४ तास पाणीपुरवठा योजना यांना गती देण्यासाठी प्रयत्न करेन. मला सहकार्य करणाऱ्या सर्वच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे मी आभार मानतो. बोडके यांच्या रूपाने एक चांगला अध्यक्ष स्थायी समितीला लाभला असून, महापालिकेतील एक शिपाई आज पालिकेच्या तिजोरीचा चालक झाला आहे, अशा शब्दामध्ये आमदार अनिल भोसले यांनी बोडके यांचा गौरव केला.