मविआची मते फुटणार?; २०० पेक्षा जास्त मते द्रौपदी मुर्मूंना मिळणार, भाजपाचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 09:57 AM2022-07-18T09:57:33+5:302022-07-18T09:58:47+5:30
७० टक्क्यापेक्षा जास्त मते एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना मिळून त्या विजयी होतील असं विधान भाजपा आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
मुंबई - गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या राष्ट्रपतीपदासाठी आज निवडणूक पार पडत आहे. या निवडणुकीत भाजपा आणि मित्रपक्षाच्या उमेदवार द्रौपर्दी मुर्मू यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे विरोधकांकडून संयुक्त उमेदवार म्हणून यशवंत सिन्हा यांना उभे केले आहे. २१ जुलैला या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. सकाळी १० वाजल्यापासून मतदानाला सुरूवात होईल. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मतदान करण्याची मुदत आहे.
या निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेस-राष्ट्रवादीचीही मते फुटतील असा दावा करण्यात येत आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, ७० टक्क्यापेक्षा जास्त मते एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना मिळून त्या विजयी होतील. राज्यसभेला शिवसेना सोबत नसताना आम्हाला १० मते जास्त पडली. विधान परिषदेत २२ मते अतिरिक्त पडली. आता शिवसेना सोबत आहे. त्यामुळे २०० पेक्षा जास्त मतदान होईल. यशवंत सिन्हा यांच्याबाबत महाराष्ट्रात कुणाला रस नाही. राज्यसभा, विधान परिषदेचा इतिहासाची पुनरावृत्ती होणार आहे. जे कुणी मागच्या वेळी विधानसभा अध्यक्ष, बहुमत चाचणीला नव्हते ते सुद्धा एनडीएच्या उमेदवाराला मतदान करतील असा दावा पाटील यांनी केला.
तसेच भाजपा एक कुटुंब आहे. कुटुंबातील प्रत्येक सदस्याची काळजी घेते. आजारी आमदारांची विचारपूस केली जाते परंतु ते काँग्रेसमध्ये होत नाहीत. त्यामुळे नाना पटोले अशी विधान करत आहेत असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. तर काँग्रेस-राष्ट्रवादीची मते फुटतील असं वाटत नाही. परंतु साम,दाम दंड भेद वापरून भाजपा रणनीती करत आहे. ही विकृती देशाच्या लोकशाहीला धोकादायक आहे असं विधान शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केलं आहे.
शिवसेना पुन्हा ताकदीनं उभी राहील - राऊत
द्रौपदी मुर्मू आदिवासी समाजातील नेतृत्व असल्याने त्यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दिला आहे. शिवसेना एनडीएमध्ये नाही. यापूर्वीही प्रतिभा पाटील, प्रणब मुखर्जी यांना शिवसेनेने पाठिंबा दिला होता. त्यामुळे भाजपामुळे द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला नाही. जी परिस्थिती येईल त्याला सामोरं जायचं. पुन्हा ताकदीने पक्ष उभा करू असा विश्वास खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केला.