Presidential Election 2022: महाराष्ट्रातून सीलबंद पेट्या दिल्लीला रवाना, २८३ सदस्यांनी केलं मतदान
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 10:39 PM2022-07-18T22:39:54+5:302022-07-18T22:40:10+5:30
काँग्रेस-राष्ट्रवादीकडून क्रॉस वोटिंग- भाजपाप्रणित NDAचा दावा
Presidential Election 2022: देशात आज राष्ट्रपती पदासाठी निवडणूक पार पडली. भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या द्रौपदी मुर्मू आणि विरोधकांचे संयुक्त उमेदवार माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्यात ही निवडणूक रंगली. आज झालेल्या निवडणुकीत ९९ टक्के लोकप्रतिनिधींनी आपला मतदानाचा हक्क बजावला. देशातील १० राज्यांत आणि एका केंद्रशासित प्रदेशात १०० टक्के मतदान झाले. राष्ट्रपती पदासाठी ७७१ खासदार आणि ४०२५ आमदारांसह ४७९६ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. या मतदान प्रक्रियेनंतर महाराष्ट्रातील सीलबंद मतपेटी आणि इतर निवडणूक साहित्य नवी दिल्ली येथे पाठविण्यात आले.
राष्ट्रीय निवडणूक आयोगामार्फत आज विधान भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये राष्ट्रपती पदाकरिता मतदान प्रक्रिया पार पडली. महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव तसेच, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र भागवत, उप सचिव तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी ऋतुराज कुडतरकर आणि अवर सचिव सुभाष नलावडे यांनी सदर निवडणूक मतपेटी आणि इतर सीलबंद साहित्य छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई येथून विमानाद्वारे राज्यसभा सचिवालय, नवी दिल्ली येथे नेण्यासाठी प्रयाण केले.
महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं?
महाराष्ट्रात राष्ट्रपती पदासाठीच्या या निवडणुकीत एकूण २८३ सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला. ५ सदस्यांना मात्र विविध कारणांमुळे आपला मतदानाचा हक्क बजावता आला नाही. दिवसभर चाललेल्या या मतदान प्रक्रियेत कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र, सत्ताधारी भाजपा आणि विरोधक यांच्याकडून दावे-प्रतिदावे करण्यात आले. भाजपाच्या बबनराव लोणीकरांचा नंबर असतानाही काँग्रेसच्या नितीन राऊतांनी आधी मतदान केल्याने त्यांचे मत बाद करावे अशी मागणी भाजपाकडून करण्यात आली. तसेच, विरोधी पक्षाच्या नेत्यांनी भाजपाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना मतदान क्रॉस वोटिंग केल्याचा दावाही सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आला. तर काँग्रेसच्या आमदारांवर आमचा विश्वास असल्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी स्पष्ट केले.