राष्ट्रपती येती घरा...तोची दिवाळी दसरा !
By admin | Published: August 31, 2016 08:07 PM2016-08-31T20:07:45+5:302016-08-31T20:07:45+5:30
कुठे नवा रस्ता केला जातोय... तर कुठे वृक्षारोप.. क़ुठे रंगरंगोटी सुरू आहे तर कुठे पुलाची दुरुस्ती़... क़ुठे साफसफाई सुरू आहे तर कुठे पोलिसांची रंगीत तालीम... तर कुठे अतिक्रमण काढण्याचे काम.
Next
>- शिवाजी सुरवसे
सोलापूर, दि.30 - कुठे नवा रस्ता केला जातोय... तर कुठे वृक्षारोप.. क़ुठे रंगरंगोटी सुरू आहे तर कुठे पुलाची दुरुस्ती़... क़ुठे साफसफाई सुरू आहे तर कुठे पोलिसांची रंगीत तालीम... तर कुठे अतिक्रमण काढण्याचे काम.
महामहीम राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या स्वागतसाठी सोलापूर शहर स्मार्ट अन् सज्ज होऊ लागले आहे. लाखो रुपयांची कामे विमानतळ ते पार्क चौक या रस्ता परिसरात सुरू आहेत़ त्यामुळेच राष्ट्रपतींचा दौरा सोलापूर शहरवासियांना कुतूहलाचा आणि उत्सुकतेचा विषय बनला आहे.
माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या अमृतमहोत्सवी सत्कारासाठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी चार सप्टेंबर रोजी सोलापुरात येत आहेत. पार्क मैदानामध्ये हा सत्कार सोहळा होणार आहे. राष्ट्रपती झाल्यापासून प्रणव मुखर्जी सोलापुरात दुस-यांना येत आहेत़ फडकुले सभागृहाच्या वास्तुचे लोकार्पण केले त्यांच्या हस्ते झाले होते. सोलापूर शहराचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश होऊन आठ ते दहा महिने होत आहेत़ महापालिकेच्या तिजोरीत तब्बल २८४ कोटी रुपये येऊन पडले आहेत. मात्र यातील एक पैशाचे देखील अद्याप काम झाले नाही़ त्यामुळे आता राष्ट्रपतीच्या दौ-यामुळे तरी शहर स्वच्छ आणि सुंदर दिसू लागले आहे.
विमानतळ ते पार्क चौका या रस्त्यावरील माती खरडून काढण्यापासून दररोज झाडलोट करणे, झाडांना आकार देणे, ज्या ठिकाणी दुभाजकात झाडी नाही तिथे झाडी लावणे,तुटलेल्या दुभाजकांची दुरुस्ती करणे, दुभाजकातील कचरा काढणे ही दररोज कामे सुरू झाली आहेत़ कित्येक वर्षापासून होटगी रोडवरील महिला हॉस्पिटलजवळील पुल एका बाजूला फुटपाथासह तुटला होता मात्र त्यांच्या दुरुस्तीला राष्ट्रपतीच्या दौ-याचा मुहूर्त लागला़ डफरीन चौकातील रस्त्याच्या मध्येच सापडलेले झाड आता विटांचे सुरक्षित गोल कंपौड करुन सजविले आहे़ डफरीन चौक ते धु्रव हॉटेल परिसरात दुभाजकामध्ये सुंदर वृक्षारोपण केले आहे़ अनेक ठिकाणी दुभाजक वाहनाच्या धडकांमुळे तुटले होते त्यांचीही दुरुस्त आता झाली़ आता दुभाजकाला काळ्या आणि पिवळ्या पट्ट्या मारण्याचे काम सुरू झाले आहे़ महापालिकेच्या प्रवेशद्वाराची देखील रंगरंगोटी सुरू झाली आहे़ आसरा चौक, पार्क चौपाटी या ठिकाणीचे अतिक्रमण काढणे सुरू झाले आहे. राष्ट्रपती आल्यापासून ते जाईपर्यंत विमानतळ ते पार्क चौका हा रस्ता वाहतुकीला बंद ठेवण्याचे नियोजन सुरू झाले आहे. एकूणच दसरा आणि दिवाळी सारखी विविध शासकीय यंत्रणा तयार करत असून शहराचा लूक या निमित्ताने बदलू लागला आहे.
राष्ट्रपती थांबणार दीड तास
जिल्हाधिकारी कार्यालयाकडील प्राप्त माहितीनुसार सध्या तरी राष्ट्रपती प्रवण मुखर्जी, राज्यपाल के विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दौरे निश्चित झाले आहेत. किती अतिमहत्त्वाच्या व्यक्ती येणार हे अद्याप निश्चित झाले नाही़ ज्यांना झेड किंवा झेड प्लस सुरक्षा आहे किंवा जे राजशिष्टाचार विभागातील व्यक्ती आहेत त्याचीच माहिती जिल्हाधिकारी कार्याकडे येत आहे़ पूर्वीच्या दौºयात राष्ट्रपती सोलापुरात एक तासासाठी होत्या मात्र आता नव्या दौºयानुसार ते चार सप्टेंबर रोजी दुपारी तीन ते साडेचार या वेळेत सोलापुरात असणार आहेत़ सोलापूर विमानतळावर जास्त विमाने होत असल्यास पार्किंगसाठी उस्मानाबाद आणि लातूरच्या विमातळाकडे काही विमाने पाठविली जातील़
राष्ट्रपती दौ-याच्या पार्श्वभूमीवर विविध शासकीय विभागाने समन्वयाने सर्व कामे पार पाडावीत़ विविध कामांचा आढावा घेण्यात आला असून दोन सप्टेंबर पर्यंत सर्व कामे पूर्ण करावीत. प्रोटोकॉलमध्ये असणा-या व्यक्तीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील एक अधिकारी नियुक्ती केला जाईल.
- रणजीत कुमार
जिल्हाधिकारी.
जिकडे तिकडे कामे सुरू
-पार्क स्टेडियममध्ये आकर्षक उभारला जातोय शामियाना
-विमानतळ ते आसरा चौक रस्ता डांबरीकरणाचे काम सुरू
-डफरीन चौक ते जुना एम्प्लॉयमेंट चौकातच्या दुभाजपकात वृक्षारोपण
-होटगी रोडवरील महिला हॉस्पिटल शेजारील तुटलेल्यास पुलाची दुरुस्ती सुरू
-विमानतळ ते पार्क चौका रस्ता दररोज केला जातोय स्वच्छ