माफीनाम्याकरिता दबाव
By admin | Published: September 28, 2016 01:06 AM2016-09-28T01:06:26+5:302016-09-28T01:06:26+5:30
मराठा क्रांती मूक मोर्चांची हेटाळणी करणारे व्यंगचित्र प्रसिद्ध केल्याबद्दल शिवसेनेच्या मुखपत्राचे कार्यकारी संपादक व खासदार संजय राऊत यांनी माफी मागावी याकरिता शिवसेनेच्या
- संदीप प्रधान, मुंबई
मराठा क्रांती मूक मोर्चांची हेटाळणी करणारे व्यंगचित्र प्रसिद्ध केल्याबद्दल शिवसेनेच्या मुखपत्राचे कार्यकारी संपादक व खासदार संजय राऊत यांनी माफी मागावी याकरिता शिवसेनेच्या मराठा खासदार व आमदारांनी दबाव टाकला असल्याचे समजते. बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी तर माफी मागा, अन्यथा राजीनामा देऊ, अशी टोकाची भाषा केल्याचे कळते.
पक्षाच्या मुखपत्रात प्रसिद्ध झालेल्या व्यंगचित्राबद्दल मंगळवारच्या अंकात माफीनामा प्रसिद्ध केला जाईल, अशी शिवसेनेतील अनेक मराठा खासदार, आमदार, पदाधिकारी व कार्यकर्ते यांची अपेक्षा होती. प्रत्यक्षात माफीनामा तर दूरच राहिला ‘व्यंगचित्राचा वाद पेटवण्यामागे समाजकंटक असल्याचा’ दावा ठळकपणे केला गेला. यामुळे मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते व नेते बिथरले. ठाणे येथील मोर्चाच्या संयोजनावर शिवसेनेचाच वरचष्मा असल्याने तेथील नेत्यांनी शिवसेनेची बाजू उचलून धरणारे निवेदन सोमवारी प्रसिद्धीस दिले होते. मात्र मंगळवारी व्यंगचित्राला विरोध करणाऱ्यांना समाजकंटक ठरवल्याने भडकलेल्या काही कार्यकर्त्यांनी प्रथम माफी मागा, अशी मागणी केली. मोर्चात फूट पडू नये म्हणून कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन केले होते. झाल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करण्याऐवजी भलत्याच गोष्टी छापून आगीत तेल ओतले जात असल्याने कार्यकर्ते संतापले आहेत, असे निवेदन दत्ता चव्हाण, रमेश आंब्रे, अविनाश पवार, कैलाश म्हापदी यांनी प्रसिद्धीस दिले आहे. ठाण्यातील शिवसेनेचे नेते पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची मराठा समाजाच्या काही कार्यकर्त्यांनी भेट घेऊन नाराजी प्रकट केल्याचे समजते.
माफीनाम्यास नकार
शिवसेना खासदार व सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी व्यंगचित्र प्रसिद्ध केल्याबद्दल माफीनामा देण्यास ठामपणे नकार दिला असल्याचे कळते. आपण आयुष्यात कधीही माफी मागितलेली नाही आणि माफी मागणार नाही, असे राऊत यांनी स्पष्ट केल्याचे समजते. त्यामुळे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना एक निवेदन प्रसिद्धीस देण्यास शिवसेनेने सांगितले. देसाई यांनी आपल्या निवेदनात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस विनाकारण हा वाद वाढवत असल्याचा आरोप केला आहे.
मुंबई भाजपाकडूनही संजय राऊत लक्ष्य
केंद्र व राज्यातील सत्ताधारी भाजपाला अनेक मुद्द्यावरून खासदार संजय राऊत हेच लक्ष्य करीत असल्याने मुखपत्रातील व्यंगचित्राच्या वादावरून भाजपानेही राऊत व पर्यायाने शिवसेनेला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनीही राऊत यांच्या माफीची मागणी केली आहे. मराठा मोर्चे हे भाजपा सरकारच्या विरोधात असल्याचे चित्र गेल्या काही दिवसांत निर्माण केले गेले होते व शिवसेनाही तेच चित्र जनमानसात ठसावे याकरिता प्रयत्न करीत होती. मात्र एका व्यंगचित्रामुळे शिवसेना ही मराठा समाजाच्यादृष्टीने खलनायक ठरल्याने आता भाजपाने वचपा काढण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत.
दसरा मेळाव्यात ठाकरे करणार भूमिका जाहीर
मराठा समाजाला आरक्षण देण्यास शिवसेनेचा पाठिंबा नाही. कारण शिवसेना कायम आरक्षणाच्या विरोधात राहिली आहे. मात्र अॅट्रॉसिटी कायद्यात बदल करण्याच्या मराठा समाजाच्या मागणीला शिवसेनेचा पाठिंबा आहे. याबाबतची सविस्तर भूमिका पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यात जाहीर करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.