अत्याचारग्रस्त चिमुकलीच्या कुटुंबावर जात पंचायतचा दबाव!
By admin | Published: November 19, 2016 01:46 AM2016-11-19T01:46:27+5:302016-11-19T01:46:27+5:30
आश्रमशाळा लैंगिक शोषण प्रकरणात पीडितेच्या कुटुंबावर जात पंचायत दबाव आणला जात आहे.
अनिल गवई
खामगाव, दि. १८- पाळा येथील आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या लैंगिक शोषणाचा प्रकार उघडकीस आल्यानंतर तक्रार करणार्या पीडितेच्या कुटुंबाला जात पंचायतकडून आपल्या समाजात तक्रार देण्याची प्रथा नसल्याचे सांगून दबाव आणला जात आहे.
आदिवासी आश्रमशाळेत दोन विद्यार्थिनींच्या लैंगिक शोषणाचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर दोन वेगवेगळ्या तक्रारींवरून मुख्य आरोपी इत्तूसिंग पवार याच्यासह १७ आरोपींविरोधात कारवाईचा फास आवळण्यात आला. या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान, नवनवीन सत्य उजेडात येत आहे. घटना उघडकीस आल्यापासून सातपुड्याच्या पर्वत रांगेतील संबंधित समाजातील जात पंचायत पदाधिकार्यांसह अमरावती जिल्ह्यातील जात पंचायतच्या काही पदाधिकारी मुक्ताईनगर तालुक्यातील हलखेडा येथे तळ ठोकल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. पीडितेच्या नातेवाइकांची जात पंचायतकडून वेगळी चौकशी केली जात आहे. पोलिसांत तक्रार देण्यापूर्वी जात पंचायतसमोर सदर प्रकरण का आणले नाही, असा सवाल करून आपल्या समाजात पोलिसांत तक्रार करण्याची प्रथा नाही, यासह विविध प्रश्नांचा भडिमार केला जात असल्याची धक्कादायक माहिती आहे.
हलखेडावासीयांकडून धीर !
जात पंचायतच्या या चौकशीमुळे दोन्ही पीडित विद्यार्थिनींच्या नातेवाइकांसमोर वेगळे संकट उभे राहिले आहे. हलखेडा आदिवासी पाड्यातील आदिवासी बांधवांकडून मात्र या कुटुंबाला धीर दिला जात असल्याची माहितीही चौकशीत समोर आली आहे.
- घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. या घटनेच्या तक्रारीबाबत हलखेडा येथील आदिवासी बांधवांकडून अत्याचारग्रस्त विद्यार्थिनीच्या नातेवाइकांवर कोणताही दबाव नाही. या कुटुंबाचे आम्ही समूपदेशन करतोय. जात पंचायत पदाधिकार्यांच्या दबावाबाबत आपणाला माहीत नाही. शासनाने अत्याचारग्रस्त विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना मदत करावी.
- बॅलिस्टरनी सती भोसले, माजी सरपंच, हलखेडा आदिवासी ग्राम.