विस्तारासाठी मुख्यमंत्र्यांवर दबाव
By admin | Published: November 27, 2015 02:56 AM2015-11-27T02:56:24+5:302015-11-27T02:56:24+5:30
विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करावा, असा दबाव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर भाजपा आणि मित्र पक्षांकडून येत आहे.
मुंबई : विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करावा, असा दबाव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर भाजपा आणि मित्र पक्षांकडून येत आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांनी अद्याप विस्ताराचा मुहूर्त ठरविलेला नाही.
सूत्रांनी सांगितले, भाजपाच्या ज्येष्ठ मंत्र्यांची काल रात्री उशिरापर्यंत बैठक झाली. त्यातही विस्ताराचा आग्रह धरण्यात आला. विशेषत: प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि सहकार मंत्री चंद्रकांत पाटील हे विस्तारासाठी आग्रही आहेत. अधिवेशनापूर्वी विस्तार करावा आणि अधिवेशनानंतर लगेच महामंडळांवरील नियुक्ती कराव्यात, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. विस्ताराबाबत मुख्यमंत्र्यांनी तारीख जाहीर केली नसली तरी दानवे आणि पाटील यांनी ३० नोव्हेंबरपूर्वी विस्तार होणार असे जाहीर केले होते. त्यामुळे विस्ताराबाबत अजूनही संभ्रम आहे. खा. राजू शेट्टी (स्वाभिमानी शेतकरी संघटना), आ. महादेव जानकर (राष्ट्रीय समाज पक्ष) आणि आ. विनायक मेटे (शिवसंग्राम) मंत्रिपदासाठी आतुर आहेत. तर खा. रामदास आठवले (रिपाइं) यांना केंद्र आणि राज्यात मंत्रिपद हवे आहे.
एकूण १२ मंत्रिपदे रिक्त आहेत. त्यात दोन शिवसेनेच्या वाट्याला जातील. मित्रपक्षांना भाजपा दोन किंवा तीन मंत्रिपदे देऊ शकते. ७ ते ८ मंत्रिपदे ही भाजपाच्या वाट्याला येतील. त्यातील दोन रिक्त ठेवण्यात येणार आहेत. याचा अर्थ भाजपाकडून ५ ते ६ जणांना संधी दिली जाईल. ती ठरविताना मुख्यमंत्री फडणवीस यांची कसरत होऊ शकते. (विशेष प्रतिनिधी)