विश्वास नांगरे यांच्या बदलीसाठी दबाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 04:11 AM2017-11-13T04:11:21+5:302017-11-13T07:48:18+5:30
सांगलीत पोलीस कोठडीत अनिकेत कोथळेचा झालेला संशयास्पद मृत्यू व त्याचा मृतदेह पोलिसांकडूनच आंबोलीत जाळण्याच्या घटनेने गृहविभाग अडचणीत आला आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील व सांगलीचे पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या बदलीसाठी विविध संघटना, राजकीय पक्ष व अनिकेतच्या नातेवाईकांकडून आता दबाव वाढत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर/सांगली : सांगलीत पोलीस कोठडीत अनिकेत कोथळेचा झालेला संशयास्पद मृत्यू व त्याचा मृतदेह पोलिसांकडूनच आंबोलीत जाळण्याच्या घटनेने गृहविभाग अडचणीत आला आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील व सांगलीचे पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या बदलीसाठी विविध संघटना, राजकीय पक्ष व अनिकेतच्या नातेवाईकांकडून आता दबाव वाढत आहे.
या संदर्भातील निर्णय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून घेतला जाईल, अशी माहिती गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी रविवारी कोल्हापुरात दिली. केसरकर यांनी सांगलीत जाऊन अनिकेतच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. मोठा- छोटा अधिकारी न पाहता दोषींवर निश्चितपणे कारवाई केली जाईल, अशी ग्वाही केसरकर यांनी दिली.
प्रत्यक्षदश्री अमोल भंडारेलाही मारण्याचा कट
अनिकेतच्या मृत्यूचा प्रत्यक्षदश्री साक्षीदार अमोल भंडारे यालाही मारण्याचा कट निलंबित पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटेने रचला होता, अशी धक्कादायक माहिती सीआयडीच्या तपासातून बाहेर आली आहे.
आत्मदहनाचा इशारा
आमच्या मागण्या मान्य न केल्यास आत्मदहन करण्याचा इशारा अनिकेतच्या कुटुंबाने केसरकर यांना दिला.
आज सर्वपक्षीय बंद
अनिकेतच्या मृत्यूप्रकरणी सोमवारी सांगलीत सर्वपक्षीय बंदचे आवाहन करण्यात आले आहे. कृती समितीतर्फे शहरातून मोटारसायकल रॅली काढण्यात येईल.
-