विनयभंगाची तक्रार मागे घेण्यास दबाव
By admin | Published: July 7, 2014 03:53 AM2014-07-07T03:53:47+5:302014-07-07T03:53:47+5:30
विनयभंगप्रकरणी साकीनाका पोलीसांत तक्रार दाखल करणाऱ्या पिडीत युवतीने तक्रार मागे घेण्यासाठी साकीनाका पोलिसांनी अप्रत्यक्ष दबाव आणल्याचा आरोप
मुंबई : व्हॉटस अपवर अश्लिल छायाचित्रे पाठवून झालेल्या विनयभंगप्रकरणी साकीनाका पोलीसांत तक्रार दाखल करणाऱ्या पिडीत युवतीने तक्रार मागे घेण्यासाठी साकीनाका पोलिसांनी अप्रत्यक्ष दबाव आणल्याचा आरोप करीत या गुन्ह्याचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाच्या महिला अत्याचार प्रतिबंधक विभागाकडे सोपवण्याची मागणी मुख्यमंत्री आणि पोलीस आयुक्तांकडे केली आहे.
खासगी कंपनीत काम करणाऱ्या या युवतीला दोन महिन्यांपूर्वी तिचा एक शाळकरी मित्र प्रविण शेट्टी भेटला होता. त्यावेळी त्याने व्हॉटस अपवर शाळेतील माजी विद्यार्थ्यांनी एक ग्रुप केला. या गु्रपद्वारे आपण संपर्कात राहू शकतो, असे सांगत तिचा मोबाईल क्रमांक घेतला. त्यानंतर त्याने ग्रुपवर अॅड करून तिला मेसेज पाठवण्यास सुरूवात केली. काही दिवसांनी प्रविणने एकूण २१ अश्लिल छायाचित्रे पाठवली. ही बाब तिने आरटीआय कार्यकर्ते मोहन कृष्णन यांना सांगताच त्यांनी साकीनाका पोलीस ठाण्यात जाण्याचा सल्ला दिला. त्यानुसार महिला पोलीस उपनिरीक्षक अश्विनी जाधव यांनी तपास करीत भादंविसह ६७ अ आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करून साकीनाका येथील परेरावाडीत राहाणाऱ्या शेट्टी याला अटक केली होती. शेट्टीविरूद्ध तक्रार दाखल करताना आपल्या आईवडिलांना तसेच भावाला मानसिक ताण येऊ नये यासाठी या प्रकाराची कल्पना दिली नसल्याचे पिडीत युवतीने स्पष्ट करीत आपल्या घरी गणवेशातील पोलीस पाठवू नये, अशी विनंतीही पोलीस अधिकाऱ्यांना केली होती. त्यानुसार वरीष्ठ अधिकाऱ्यांनीही याबाबत खात्री दिली होती. पण १९ जून रोजी जबाब नोंदवत असतानाच आपले नाव नाईक असल्याचे सांगणारा एक बीट मार्शल थेट आपल्या घरी गेला आणि त्याने आपल्या भावाला दमदाटी केल्याचे युवतीने सांगितले. (प्रतिनिधी)