प्रतिष्ठा जपली, नेत्यांनी राखले बाजार समितीचे गड; सत्तेसाठी स्थानिक आघाड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2023 06:33 AM2023-05-02T06:33:12+5:302023-05-02T06:33:25+5:30
विखे-पाटील यांनी सत्ता राखली; बच्चू कडू यांनी चांदूर बाजार राखले
मुंबई - बाजार समिती निवडणुकीत अहमदनगर जिल्ह्यात नेत्यांनी स्थानिक आघाड्या करून आपापले गड शाबूत राखले. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे, माजी आमदार चंद्रशेखर घुले, माजी मंत्री शंकरराव गडाख, आमदार आशुतोष काळे व माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी आपापल्या बाजार समितीतील सत्ता राखण्यात यश मिळविले. जामखेडमध्ये आमदार रोहित पवार यांनी माजी मंत्री राम शिंदे यांच्या हातून बाजार समितीची सत्ता काढून घेण्यात यश मिळविले. राहाता बाजार समितीत २० वर्षांनंतर प्रथमच निवडणूक लागली होती.
विखेंना या निवडणुकीत पराभूत करण्यासाठी बाळासाहेब थोरातांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. पण, विखेंनी थोरातांचे मनसुबे उधळून लावले. नेवाशात गडाखांनी २० वर्षांपासूनची आपली सत्ता कायम ठेवली. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव बाजार समितीत शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे व ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी विकास पॅनलने १८ पैकी १५ जागांवर दणदणीत विजय मिळविला.
बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीत महाविकास आघाडीने भाजपला धक्का देत बाजी मारली. वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर बाजार समितीत माजी राज्यमंत्री सुभाषराव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी सहकार पॅनलने आपले वर्चस्व सिद्ध केले. अमरावती जिल्ह्यातील तीन बाजार समित्यांवर महाविकास आघाडीने विजय मिळविला. तर दोन प्रहारकडे आणि एक भाजपकडे गेली. आ. बच्चू कडू यांनी चांदूर बाजार राखले, तर अचलपूर गमावले. वरूडमध्ये खा. अनिल बोंडे, माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे, दर्यापुरात आ. बळवंत वानखडे व सहकारी, धारणीत आ. राजकुमार पटेल व मित्रपक्ष, धामणगाव रेल्वे बाजार समितीमध्ये माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वातील पॅनलने दबदबा कायम राखला. मूर्तिजापूर बाजार समितीवर माजी आमदार भैयासाहेब तिडके प्रणीत शेतकरी सहकार पॅनलने वर्चस्व मिळविले. पुणे जिल्ह्यातील जुन्नर बाजार समितीत राष्ट्रवादी व काँग्रेस पुरस्कृत शिवनेर सहकार पॅनलने १८ पैकी १३ जागांवर विजय मिळविला.