‘हिंमत’वान डॉक्टरमुळे थांबणार कट प्रॅक्टिस!
By admin | Published: July 1, 2017 03:13 AM2017-07-01T03:13:33+5:302017-07-01T03:13:33+5:30
काही दिवसांपूर्वी एशियन हार्ट इन्स्टिट्यूटने डॉक्टरांच्या कमिशनविरोधातील होर्डिंग लावल्याने, ‘कट प्रॅक्टिस’चा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला.
स्नेहा मोरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : काही दिवसांपूर्वी एशियन हार्ट इन्स्टिट्यूटने डॉक्टरांच्या कमिशनविरोधातील होर्डिंग लावल्याने, ‘कट प्रॅक्टिस’चा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. यापूर्वी महाडचे डॉ. हिंमतराव बावस्कर यांनी २००६ सालापासून या विरोधात संघर्ष उभारला होता. अखेरीस ११ वर्षांनंतर डॉ. बावस्कर यांच्या या संघर्षाला यश मिळाले असून, आता राज्यात कट प्रॅक्टिसविरोधी कायदा प्रस्तावित आहे. महत्त्वाचे म्हणजे, या कायद्यात डॉक्टरसह संस्थेलाही शिक्षेची तरतूद असणार आहे.
डॉ. बावस्कर यांच्या हिमतीमुळे २००६ साली महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेसमोर वैद्यकीय ‘कट प्रॅक्टिस’चा गंभीर आजार अधिकृतपणे समोर आला. त्यानंतर, डॉ. बावस्कर यांच्या अनेक वर्षांच्या संघर्षाला आता दिशा मिळाली असून, राज्यात लवकरच येणाऱ्या कट प्रॅक्टिसविरोधी कायदा तयार करणाऱ्या समितीत डॉ. बावस्कर यांचा समावेश आहे.
समितीद्वारे डॉक्टर आणि संबंधित संस्था अशा दोन्ही घटकांना कट प्रॅक्टिसविरोधात शिक्षेची तरतूद असणार आहे. डॉक्टरला तीन महिन्यांचा कारावास आणि पाच हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल. शिवाय, पुन्हा कट प्रॅक्टिस केल्यास डॉक्टरकडून २५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल, असे समितीद्वारे राज्य शासनाला सुचविले असल्याचे डॉ. बावस्कर यांनी सांगितले. येत्या हिवाळी अधिवेशनात या कायद्याचा मसुदा राज्य शासनाला सादर करणार आहोत. महत्त्वाचे म्हणजे, या कट प्रॅक्टिस विरोधातील जगभरातील कायद्यांची पडताळणी आणि शिक्षेच्या तरतुदींच्या अभ्यास करण्याचे कामही सुरू असल्याचे डॉ. बावस्कर यांनी सांगितले.
डॉ. बावस्कर यांच्यासह या समितीत राज्याचे माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित, केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे, प्रिन्स अली खान रुग्णालयाचे संचालक डॉ. संजय ओक, महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे डॉ. अभय चौधरी, एशियन हार्ट इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष डॉ.रमाकांत पांडा, इंडियन मेडिकल असोसिएशनचा सदस्य, बालरोगतज्ज्ञ डॉ. यशवंत आमडेकर, त्वचारोगतज्ज्ञ डॉ. अमित कारखानीस यांचा समावेश आहे.
‘कट प्रॅक्टिस’ मुळापासून नष्ट केल्यास, यामुळे आरोग्यसेवा अधिक सुलभरीत्या उपलब्ध होईल. सामान्यांवर आरोग्यसेवेचा आर्थिक ताण वाढतो आहे. याला ‘कट प्रॅक्टिस’ही कारणीभूत आहे, त्यामुळे भविष्यात कायद्याच्या चौकटीत राहून कट प्रॅक्टिसला वेळीच आळा घातल्यास, आरोग्यसेवेचा दर २५ टक्क्यांनी घसरेल, असे डॉ. बावस्कर यांनी सांगितले.