अर्भक मृत्यू टाळण्यासाठी 'मा' अभियान राबविणार
By admin | Published: August 23, 2016 05:59 PM2016-08-23T17:59:15+5:302016-08-23T17:59:15+5:30
स्तनपानाला प्रोत्साहन देण्याकरीता तसेच अर्भक मृत्यू दर कमी करण्याच्या दृष्टीने राज्यभरात आता 'मा' हे अभियान राबविण्यात येणार आहे.
नीलेश शहाकार
बुलडाणा, दि. २३ : नवजात अर्भकास एक तासाच्या आत स्तनपान दिल्यामुळे २० टक्के अर्भक मृत्यू टाळता येतात. ही बाब लक्षात घेता, स्तनपानाला प्रोत्साहन देण्याकरीता तसेच अर्भक मृत्यू दर कमी करण्याच्या दृष्टीने राज्यभरात आता 'मा' हे अभियान राबविण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्याकरीता अतिरिक्त निधी केंद्र शासनाकडून मंजूर करण्यात येणार आहे.
मातेचे स्तनपान हे बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे. ही बाबत लक्षात घेवून केंद्र शासनाच्यावतीने ५ आॅगस्ट पासून 'मदर एॅब्सुल्युट अॅफेक्शन' अर्थात 'मा' हे अभियानाला केंद्रस्तरावर सुरुवात करण्यात आली असून आता सदर अभियान राज्यपातळीवर राबविण्यात येणार आहे. हे अभियान जुलै २०१७ पर्यत कार्यान्वित राहणार आहे. यासाठी प्रत्येक
जिल्ह्यासाठी ४.३ लाख रुपयाच्या निधीची तरतूद करण्यात येणार आहे.
शासनाने केलेल्या सर्वक्षणानुसार, बालकांना जन्मापासून सुरुवातीच्या सहा महिन्यापर्यत स्तनपान केले जाते, अश्या बालाकांमध्ये इतर बालकांच्या तुलनेने न्युमोनिया होण्याचे प्रमाण १५ पटीने आणि अतिसार होण्याचे प्रमाण ११ पटीने कमी असते. यामुळे स्तनपाला प्रोत्साहन देण्याकरीता तसेच अर्भक मृत्यूू दर कमी करण्याच्या दृष्टीने हे अभियान राबविण्यात येत आहे,
विदर्भात ५ हजार २४३ अर्भकमृत्यूची नोंद
महाराष्ट्र राज्य कुटुंब कल्याण विभागाने सादर केलेल्या माहितीनुसार राज्याच्या एकूण अर्भक मृत्यूतील २० टक्के मृत्यू हे विदर्भात झाले आहेत. गत वर्षभरात विदर्भात ५ हजार २४३ अर्भकमृत्यूची नोंदण करण्यात आली आहे.मात्र स्तनपान सप्ताह व गरोदर माता पोषण आहार योजनेतून ही आकडेवारी कमी करण्यात राज्य शासनाला बऱ्याचपैकी यश प्राप्त झाले आहे.
विदर्भातील अर्भकमृत्यू(२०१५-१६)
अमरावती ७०६
अकोला ६८७
गडचिरोली ६०९
बुलडाणा ५४७
गोंदिया ४६१
चंद्रपूर ४५५
भंडारा ३४६
नागपूर २९७
यवतमाळ २६८
वाशीम २०८
वर्धा १५२