दुपारच्या डुलकीने होतो अनेक रोगांपासून बचाव
By admin | Published: May 26, 2017 01:03 AM2017-05-26T01:03:15+5:302017-05-26T01:03:15+5:30
वामकुक्षी (दुपारी डुलकी घेणे) आरोग्यासाठी लाभदायक असते, असे आयुर्वेदाने खूप आधीच सांगितले होते. आधुनिक विज्ञानानेही आता यावर शिक्कामोर्तब केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वामकुक्षी (दुपारी डुलकी घेणे) आरोग्यासाठी लाभदायक असते, असे आयुर्वेदाने खूप आधीच सांगितले होते. आधुनिक विज्ञानानेही आता यावर शिक्कामोर्तब केले आहे.
नवे संशोधन हॉर्वर्ड स्कूल आॅफ पब्लिक हेल्थने केले. दुपारी अर्धा तासाची झोप किंवा डुलकी घेतली तर अनेक रोगांपासून बचाव होऊ शकतो, असे यात आढळून आले आहे. वामकुक्षी घेणाऱ्यांचा मेंदू अधिक ताजातवाना राहतो आणि अधिक क्षमतेने काम करतो. वामकुक्षीमुळे सामान्य व्यक्तींत हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता ३३ टक्क्यांनी कमी होते. नोकरदारांसाठी तर दुपारची डुलकी अधिक लाभदायक असते. डुलकीमुळे त्यांच्यात हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता ६४ टक्क्यांनी कमी होते, असे संशोधकांना आढळले. दुपारच्या डुलकीबाबत चीनमध्येही एक संशोधन करण्यात आले. या संशोधनात ६५ वर्षांहून अधिक वयाच्या ३ हजार लोकांना सामील करण्यात आले होते. ज्या ज्येष्ठांनी वामकुक्षी घेतली होती त्यांनी गणिते अधिक चांगल्या प्रकारे आणि सहजपणे सोडविली तर दुपारी डुलकी न घेणारे गणिते सोडविण्यात मागे पडले.
वामकुक्षीला इंग्रजीत सिएस्टा असे म्हणतात हा शब्द स्पॅनिशमधून इंग्रजीत आला आहे.
दुपारी झोपच घेतलीच पाहिजे, असे नाही; परंतु कामातून थोडी उसंत आवश्यक आहे. थोडा आराम गरजेचा आहे. जे लोक दुपारी काही काळ आराम करतात किंवा डुलकी घेतात त्यांची तणाव पातळी (स्ट्रेस लेव्हल) कमी असते. तणावामुळे वाढणाऱ्या हार्मोन्सची पातळीही वामकुक्षीने कमी होते. दुपारी आराम करणे निश्चितच लाभदायक आहे.
-डॉ. जय देशमुख
वरिष्ठ चिकित्सक
वामकुक्षीचे अनेक फायदे आहेत. यामुळे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. हृदयालाही याचा लाभ होतो. तुम्ही दुपारी थोडावेळ आराम केला तर शरीराच्या संपूर्ण कार्यप्रणालीला आराम मिळतो. ही गोष्ट आरोग्याच्या द्दृष्टीने निश्चितच हितकारक आहे.
-डॉ. जसपाल अनरेजा
हृदयरोगतज्ज्ञ