निवले आंदोलन; पेटले फड!--पुण्यात उद्रेक, कऱ्हाडात शांतता
By admin | Published: January 14, 2015 10:08 PM2015-01-14T22:08:54+5:302015-01-14T23:51:35+5:30
मनात आग... उसात जाळ !
प्रमोद सुकरे -कऱ्हाडऊसदराचा प्रश्न निकालात निघाला नसतानाही यावर्षी मोळ्या गव्हाणीत पडल्या. गेल्या काही वर्षांत प्रथमच असे झाले. गाळप सुरू झाल्यानंतर ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी पुण्याच्या साखर भवनात राडा केल्यामुळे ऊसदराचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला. पुण्यासह सांगली जिल्ह्यात काही ठिकाणी ‘स्वाभिमानी’चे आंदोलन सुरू असताना गतवर्षी आंदोलनाचे केंद्र बनलेल्या कऱ्हाडात मात्र शांतता दिसते आहे. एकही कार्यकर्ता ऊसदराबाबत आंदोलन करायला किंवा बोलायलाही तयार नाही.
गतवर्षी ‘स्वाभिमानी’ने कऱ्हाडला आंदोलनाचे केंद्र बनविले होते. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे ‘होमटाऊन’ असल्याने सातारा, सांगली, कोल्हापूरसह सोलापूर जिल्ह्यातील कार्यकर्तेही कऱ्हाडात दाखल झाले होते. काही दिवस पाचवड येथे धरणे आंदोलन केल्यानंतर आंदोलनकांनी संयम सोडला. रस्त्यावर उतरून जाळपोळ, दगडफेक करीत महामार्ग रोखला. हळूहळू आंदोलनाचे लोण इतर जिल्ह्यांत पोहोचले. आंदोलनकांनी महामार्गासह राज्यमार्ग व गावागावातील अंतर्गत रस्त्यांवर जाळपोळ केली. झाडे पाडून रस्ते रोखले. सार्वजनिक मालमत्तेचे प्रचंड नुकसान त्यावेळी झाले होते. मात्र, काही दिवसांतच पोलीस कारवाईचा भुंगा आंदोलनकांच्या मागे लागला. पोलिसांनी कार्यकर्त्यांवर अनेक कलमे लावली. त्यामुळे ‘मांडवाखालून’ जाताना प्रत्येक कार्यकर्त्याला त्रास झाला.
यावर्षीही ऊसदराचा प्रश्न मिटत नाही, तोपर्यंत कारखाने सुरू होऊ देणार नाही, असा पवित्रा संघटनांनी घेतला होता. मात्र, त्यात एकवाक्यता नसल्याने कारखाने सुरू झाले. दोन महिन्यांचा कालावधी उलटला तरी दराचा प्रश्न मिटलेला नाही.
अशातच दोन दिवसांपूर्वी ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी पुण्याच्या साखर भवनात तोडफोड केली. त्यामुळे खासदार राजू शेट्टी, सदाभाऊ खोत यांच्यासह काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली.
या आंदोलनाचे लोण सातारा जिल्ह्यात पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, अद्याप कोठेही अनुचित प्रकार घडलेला नाही. ‘स्वाभिमानी’चे कार्यकर्ते अद्याप शांतच आहेत.
श्रेष्ठींशी बोलतो!
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांशी संपर्क साधला असता ‘येत्या दोन दिवसांत पुण्याला जाऊन पक्षश्रेष्ठींशी बोलणार आहे. काही दिवसांपूर्वी आम्ही गेलो होतो; मात्र त्यांच्याकडून कोणताही आदेश आम्हाला मिळाला नव्हता. आता पुन्हा आम्ही जाणार असून त्यावेळी जो आदेश मिळेल त्यानुसार आंदोलनाची दिशा ठरवू,’ असे त्यांनी सांगितले.
मनात आग... उसात जाळ !
संजय कदम - वाठार स्टेशन
‘दुष्काळात तेरावा’ अशी यंदाच्या ऊसगाळप हंगामाची गत झाली आहे. ७० ते ७५ दिवस झाले तरी अद्याप ऊसदराला मुहूर्त मिळालेला नाही. दोन महिन्यांनी जाग आलेल्या संघटनांनी आंदोलनाची ठिणगी टाकल्याने यावर्षी तोडणीविना उसाचे क्षेत्र शिल्लक राहण्याची धास्ती शेतकऱ्यांना लागली आहे. अशातच एप्रिल-मे महिन्यात पेटणारे उसाचे फड जानेवारीत कडाक्याच्या थंडीत का पेटत आहेत? यामागे नक्की कोणती परिस्थिती आहे, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत.
गतवर्षीच्या हंगामाएवढेच क्षेत्र या हंगामात कारखानदारांपुढे आहे. हे क्षेत्र वेळेत संपविण्याची त्यांना घाई आहे, तर वर्षभर पोटच्या मुलाप्रमाणे जपलेला ऊस वेळेत तुटून जावा, यासाठी शेतकऱ्यांची घाई असल्याने ऊस घालवण्यासाठी दराचा किंचितही विचार न करता मिळेल त्या कारखान्याच्या मर्जीप्रमाणे ऊस घातला जात आहे. जिल्ह्याची सद्य:स्थिती पाहता ‘रयत’ वगळता सर्वच कारखान्यांनी हंगामाचा प्रारंभ केला आहे. आजअखेर जवळपास २३ लाख ७७ हजार ९७० टन उसाचे गाळप पूर्ण केले असून, जवळपास ४० ते ४५ लाख टन उसाचे गाळप शिल्लक आहे. ही परिस्थिती पाहता मे किंवा १५ जूनपर्यंत हे संपूर्ण गाळप पूर्ण होईल, अशी परिस्थिती आहे.
यंदा ऊसतोड मजुरांची संख्या मुबलक आहे. गाळपक्षमतेप्रमाणे सर्वच कारखान्यांचे गाळप सुरू आहे. त्यामुळे ऊस शिल्लक राहणार नाही, असा विश्वास कारखानदार व्यक्त करीत आहेत. मग तरीही उसाच्या फडात आग का दिसत आहे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. ऊसतोड लवकर व्हावी यासाठी सामान्यत: एप्रिल-मे महिन्यात ऊस पेटविण्याचे प्रमाण वाढल्याचे अलीकडच्या काही वर्षांत दिसून आले आहे. तोडकऱ्यांचा वेग त्यावेळी कमी झालेला असतो. परंतु सध्या ऐन थंडीत ऊस पेटण्यामागे नैसर्गिक कारण आहे की अन्य काही, असा प्रश्न आहे. ऊस पेटल्यानंतर कारखाना त्वरित तोड देतो, ही शेतकऱ्यांची मानसिकता आहे. परंतु तोडणी कार्यक्रमापेक्षा तीन महिने अगोदर ऊस पेटला तर दरात प्रतिटन किमान ३०० रुपये आणि दोन महिने अगोदर पेटला तर प्रतिटन २०० रुपये कपात कारखाने करतातच. त्यामुळे इतक्या लवकर शेतकरी ऊस पेटवू शकत नाही.
परंतु बऱ्याच वेळा उसाच्या फडातून गेलेल्या विजेच्या तारांमधून ठिणग्या पडून तसेच शेजारच्या तुटलेल्या फडाची पाचट पेटविल्यानंतर निष्काळजीपणामुळे आगी लागतात. यावर्षी भारनियमनामुळे कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांना उसाला पाणी द्यावे लागत आहे. त्यामुळे फडाशेजारीच शेकोट्या पेटविल्या जात आहेत.
दुसरीकडे, हंगामाच्या मध्यावरच ऊसदरासाठी आंदोलनाची ठिणगी पडल्याने अगोदरच १५ ते २० दिवस लांबणीवर गेलेला हंगाम आणखी लांबणीवर पडण्याची धास्ती घेतल्याने शिल्लक उसाच्या फडात आग भडकत असल्याचीही चर्चा जोर धरत आहे.
यंदाच्या हंगामात कोणत्याच कारखान्याची तोडणी यंत्रणा कमी नाही. त्यामुळे क्षमतेप्रमाणे गाळप होत आहे. ऊस लागवडीच्या पद्धतीत भविष्यात बदल होऊन कारखान्यांच्या कार्यक्रमानुसार लागवड केल्यास ऊस वेळेत तोडता येईल.
- विजय वाबळे,
कार्यकारी संचालक,
किसन वीर साखर कारखाना
जिल्ह्यात यावर्षी ६५ ते ७० लाख टन उसाचे गाळप अपेक्षित आहे. यापैकी २३ लाखांचे गाळप पूर्ण झाले असून, उर्वरित गाळप मेअखेर पूर्ण होईल. उसाचा अजून तरी पीक विम्यात समावेश नाही. परंतु भविष्यात तो होण्याची गरज आहे.
- पांडुरंग साठे,
सहसंचालक, साखर संकुल पुणे