आधीच्या सरकारने शिक्षकांना गुलाम करण्याचा प्रयत्न केला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2020 05:16 AM2020-02-09T05:16:28+5:302020-02-09T05:16:49+5:30
संजय राऊत यांची टीका । शिक्षक भारतीचे राज्यव्यापी अधिवेशन
मुंबई : मागील पाच वर्षांत शिक्षण क्षेत्रात विष पेरण्याचा प्रयत्न झाला. या काळात पाठ्यपुस्तकातले धडे आणि इतिहास बदलला, त्यातून विद्यार्थ्यांची डोकी खराब करण्याचा प्रयत्न झाला. इतकेच काय तर शिक्षकाला राजकीय कार्यकर्ता बनवून गुलाम करण्याचा प्रयत्न झाल्याची टीका शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केली. आमदार कपिल पाटील यांनी शनिवारी आयोजित केलेल्या शिक्षक भारतीच्या राज्यव्यापी अधिवेशनात राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत फटकेबाजी केली.
शिक्षकांचा वापर राजकीय स्वार्थासाठी न करता त्यांना महाराष्ट्र घडविण्याचे त्यांचे काम करू दिले जावे अशी अपेक्षाही राऊत यांनी व्यक्त केली. शिक्षकांच्या मागण्या पूर्ण होण्यासाठी मंत्रालयाबाहेर त्याचे होर्डिंग लावावे म्हणजे मुख्यमंत्र्यांना मागण्यांचे गांभीर्य लक्षात येईल असा सल्लाही दिला. शरद पवार हे उत्तम राज्यकर्ते असून शिक्षकांच्या १००हून अधिक मागण्यांचे पत्र त्यांनी पाहिले आहे. त्यावर लाल, हिरव्या शाईने खुणाही केल्या आहेत. त्यामुळे शिक्षकांचे प्रश्न लवकरच मार्गी लागतील, असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला.
तर, शिक्षकांचे सारे प्रश्न एकाच वेळी सोडविता येणार नाहीत. मात्र त्यांचा प्राधान्यक्रम ठरवून त्यावर तातडीने कारवाई करता येईल, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. नवीन पिढी घडवण्याची जबाबदारी ज्यांच्या शिरावर आहे, त्यांच्या भवितव्याचे प्रश्न मला अत्यंत महत्त्वाचे वाटतात. म्हणूनच गेल्या पाच वर्षांत मी इतर कोणत्याही मंत्र्यांकडे गेलो नाही, पण शिक्षणमंत्र्यांना मात्र भेटलो, असे पवार म्हणाले.
चित्र बदलणार
राज्यात शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण झालेले आहे. आता पाडेवस्त्यांवरील शिक्षणाकडे लक्ष देणे ही राज्यकर्त्यांची जबाबदारी आहे. मात्र इथे उलटे होऊन राज्यातील १३०० शाळा बंद करण्याचा घाट घातला गेला, हे दुर्दैवी आहे. आपल्या सरकारच्या काळात आपण हे बदलू, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिक्षकांना दिला.