“पूर्वीचे सुलतान मंदिरे पाडत होते, आजचे सुलतान शिवसेना फोडत आहेत”

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2022 07:54 AM2022-07-20T07:54:42+5:302022-07-20T07:55:20+5:30

शिवसेनेची बोचरी टीका.

Previous Sultans were demolishing temples todays Sultans are smashing Shiv Sena saamana editorial targets eknath shinde rebel mlas maharashtra political condition | “पूर्वीचे सुलतान मंदिरे पाडत होते, आजचे सुलतान शिवसेना फोडत आहेत”

“पूर्वीचे सुलतान मंदिरे पाडत होते, आजचे सुलतान शिवसेना फोडत आहेत”

googlenewsNext

महाराष्ट्राची सूत्रे आज संपूर्णपणे दिल्लीच्याच हाती आहेत. शिवरायांच्या महाराष्ट्राची इतकी दारुण अवस्था कधीच झाली नव्हती. शिवसेना फोडणे व त्या फुटीचे नजराणे दिल्लीश्वरांच्या चरणी अर्पण करणे यातच मुख्यमंत्री शिंदे मश्गूल आहेत. राज्य बुडते आहे. ते बुडाले तरी पर्वा नाही, अशी सध्याच्या सत्ताधाऱ्यांची धारणा आहे, असे म्हणत शिवसेनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.

त्या प्रलयात महाराष्ट्राचा स्वाभिमान व मराठी अस्मिताही गटांगळय़ा खाताना दिसत आहे, हे गंभीर आहे. महाराष्ट्रावर सध्या अस्मानी संकट आहेच, पण सुलतानी संकटाने राज्य जास्त बेजार आहे. पूर्वीचे सुलतान मंदिरे पाडत होते, आजचे सुलतान शिवसेना फोडत आहेत, असे शिवसेनेने म्हटले आहे. शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.

काय म्हटलेय अग्रलेखात?
महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा फैसला आता सर्वोच्च न्यायालयातच लागेल. मुख्यमंत्री शिंदे हे तातडीने दिल्लीस पोहोचले आहेत. दिल्लीभेटीत त्यांनी मोदी-शहांच्या चरणी शिवसेना खासदारांचाही नजराणा चढवला व उपकाराच्या ओझ्यातून आणखी थोडे मुक्त झाले. स्वतःस शिवसेनेचे मुख्यमंत्री म्हणवून घेणारे शिंदे वारंवार दिल्ली दरबारी का जात आहेत, हा प्रश्नच आहे. शिंदे हे म्हणे मंत्रिमंडळाबाबत चर्चा करण्यासाठी दिल्लीत गेले. हे आक्रित आहे, असे शिवसेनेने म्हटलेय.

दिल्लीसमोर झुकल्याने, मोडून पडल्यानेच फुटीर गटाला मुख्यमंत्रीपद मिळाले हे आता उघड झाले. दिल्लीपुढे महाराष्ट्र झुकला नाही, झुकणार नाही हा स्वाभिमानाचा मंत्र निदान यावेळी तरी दिल्लीने मोडून दाखवला. मुख्यमंत्री शिंदे दिल्लीत आले व शिवसेनेच्या बारा खासदारांसोबत त्यांनी शक्तिप्रदर्शन केले व त्याआधी म्हणे या सर्व शक्तिमान खासदारांना केंद्र सरकारने ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरवली. खासदारांच्या मतदारसंघातील घरे व त्यांची कार्यालये पोलिसांनी वेढून ठेवली आहेत. या शक्तिमान, स्वाभिमानी खासदारांना इतके भय कोणाचे वाटत आहे?, असा सवालही शिवसेनेने केलाय.

शिवसेनेकडून विजयाची संधी असल्यानेच ते भगव्याचे तात्पुरते शिलेदार बनले. नाहीतर यांचे गोत्र काँग्रेस किंवा राष्ट्रवादीच आहे हे काय कुणाला माहीत नाही, पण भारतीय जनता पक्षातही आता मूळच्या हिंदुत्ववाद्यांपेक्षा अशा बाहय़ जात-गोत्र-धर्मवाल्यांचा भरणा झाला आहे. भाजपचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार जगदीप धनकड हे अनेक पक्षांचा प्रवास करीत भाजपात पोहोचले. केंद्रीय मंत्रिमंडळातील निम्मे सदस्य हे मूळच्या हिंदुत्ववादी गोत्राचे नसून काँग्रेस किंवा अन्य जातकुळीतले आहेत, असे शिवसेनेने म्हटलेय.

Web Title: Previous Sultans were demolishing temples todays Sultans are smashing Shiv Sena saamana editorial targets eknath shinde rebel mlas maharashtra political condition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.