बेबीविरुद्ध पूर्वीचे बारा गुन्ह
By admin | Published: March 16, 2015 11:47 PM2015-03-16T23:47:36+5:302015-03-16T23:47:36+5:30
अंमली पदार्थ तस्करी : काळोखेच्या कोठडीत पाच दिवसांची वाढे
सातारा/खंडाळा : अंमली पदार्थ बाळगल्याबद्दल अटकेत असलेला पोलीस हवालदार धर्मराज काळोखे याचे ज्या बेबी पाटणकरशी घनिष्ट संबंध असल्याचे समोर आले आहे, तिच्याविरुद्ध अंमली पदार्थाच्या तस्करीचे पूर्वीचे बारा गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, धर्मराज काळोखेच्या पोलीस कोठडीची मुदत खंडाळा न्यायालयाने सोमवारी पाच दिवसांनी वाढविली.
कण्हेरी (ता. खंडाळा) येथे आढळलेल्या ‘एमडी’ या अंमली पदार्थाच्या साठ्याप्रकरणी काळोखे अटकेत आहे. मात्र, कोट्यवधी रुपयांच्या या साठ्याच्या संदर्भात अन्य कोणालाही अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले नाही. काळोखेच्या संभाव्य साथीदारांचा शोध सुरू असला तरी पोलिसांच्या हाती अद्याप काहीच लागले नसल्याने या प्रकरणातील गूढ वाढले आहे. दरम्यान, या गुन्ह्यात वापरण्यात आलेली एक कार खंडाळा पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. दरम्यान, गुन्ह्याशी संबंधित एकंदर चार वाहने पोलिसांच्या रडारवर असून, त्यातील दोन चारचाकी तर दोन दुचाकी वाहने आहेत. मुंबईतील कुप्रसिद्ध ‘ड्रग पेडलर’ बेबी पाटणकर हिच्याशी काळोखेचे संबंध असल्याचे तपासात उघड झाले होते. बेबीची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची असून, अंमली पदार्थविरोधी पथकाच्या रेकॉर्डवर तिचे नाव आहे. तिच्यावर बारा गुन्हे दाखल असून, काळोखेला अटक झाल्यापासून ती पोलिसांना गुंगारा देत आहे. तिचा मुलगा आणि सुनेविरुद्धही गुन्हे असल्याची माहिती उघड झाली आहे. पोलिसांचे पथक दोन वेळा मुंबईला तपासासाठी गेले होते; मात्र त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले. (प्रतिनिधी)
मुंबई पोलीस ‘वेटिंग’वर
या प्रकरणातील आरोपी धर्मराज काळोखे याला पुन्हा पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. काळोखेवर मुंबई येथील मरिनड्राइव्ह पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या ठाण्यातील काळोखेच्या लॉकरमध्ये बारा किलो ‘एमडी’ सापडले होते. त्या गुन्ह्याच्या तपासासंदर्भात काळोखेला ताब्यात घेण्यासाठी मुंबई पोलिसांचे पथक खंडाळ्यात आले होते; मात्र खंडाळ्यातच आरोपीला कोठडी सुनावण्यात आल्याने मुंबई पोलीस ‘वेटिंग’वर राहिले आहेत.