मुंबई-सिंधुदुर्ग विमान प्रवासाचा भाव हापूस आंब्यांप्रमाणे वधारला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2021 07:11 AM2021-09-30T07:11:58+5:302021-09-30T07:12:26+5:30
बुकिंगला प्रारंभ : तिकीट दर पोहोचले पाच हजारांवर.
मुंबई : आंब्याचा हंगाम सुरू झाला की कोकणच्या हापूसचा भाव जसा वधारतो, त्याप्रमाणे मुंबई-सिंधुदूर्ग विमान प्रवासाचे दरही वाढले आहेत. तिकीट बुकिंग सुरू झाल्यापासून या मार्गावरील सेवाला प्रचंड प्रतिसाद मिळत असून, उद्घाटनाआधी महिन्याभराचे आरक्षण जवळपास फुल्ल होत आले आहे.
येत्या ९ ऑक्टोबरपासून चिपी विमानतळावरून नियमीत प्रवासी वाहतूक सुरू होणार असून, एअर इंडियाची उपकंपनी अलायन्स एअर मुंबई-सिंधुदुर्ग-मुंबई मार्गावर दिवसांतून एक फेरी चालविणार आहे. २३ सप्टेंबरपासून या फेरीचे बुकिंग सुरू करण्यात आले. त्यासाठी २ हजार ५२० रुपये किमान शुल्क ठरविण्यात आले. मात्र, कोकण रेल्वे प्रमाणे हवाई प्रवासालाही तुफान प्रतिसाद मिळत असल्याने तिकिटांचे भाव वाढत आहेत.
विमान कंपनीने सुपर व्हॅल्यू, फ्लेक्सी सेव्हर आणि फ्लेक्सिबल अशा तीन टप्प्यांत तिकिटांचे वर्गीकरण केले आहे. सुपर व्हॅल्यूचा दर २,५४० रुपये असून, त्याचे बुकिंग जवळपास फुल्ल होत आले आहे. त्यामुळे उर्वरित तिकिटे चढ्या दराने विकली जात आहेत. १३ ऑक्टोबरचा फ्लेक्सी सेव्हर तिकिटांचा दर ४,७२५ रुपये, तर फ्लेक्सिबल आसनाचे तिकीट तब्बल १३ हजार १२५ रुपयांनी विकले जात आहे. विशेष म्हणजे १५ ऑक्टोबरला फ्लेक्सी सेव्हरचे दर ६ हजार ३०० रुपये आहेत.
विमान कंपनी म्हणते...
फ्लेक्सिबल प्रकारच्या तिकिटांत प्रवाशांना बऱ्याच अतिरिक्त सुविधा मिळतात. कोणत्याही शुल्कविना प्रवासाची तारीख बदलणे, फ्री कॅन्सलेशनसह अनेक सुविधांचा समावेश आहे. त्यामुळे या तिकिटांचे दर अधिक असतात. फ्लेक्सी सेव्हरसाठी मात्र उपरोक्त सुविधांसाठी शुल्कआकारणी केली जाते, अशी माहिती अलायन्स एअरच्या प्रवक्त्यांनी दिली.