कांद्याला प्रतिकिलो दीड रुपया दर
By admin | Published: April 27, 2016 02:13 AM2016-04-27T02:13:38+5:302016-04-27T02:13:38+5:30
मागणीपेक्षा उत्पादन वाढल्यामुळे कांद्याचे दर कमालीचे कोसळले आहेत.
बारामती : मागणीपेक्षा उत्पादन वाढल्यामुळे कांद्याचे दर कमालीचे कोसळले आहेत. कांद्याला सध्या फक्त दीड रुपया ते साडेसहा रुपये प्रतिकिलोप्रमाणे दर मिळत आहे. उत्पादन खर्चदेखील त्यातून मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी कांदाचाळीत साठवण केली आहे. या हंगामातील कांदा ओला असल्यामुळे सडण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे दोन्ही बाजूने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
बारामती, इंदापूर तालुक्यात उन्हाळी कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. उन्हाळ्यात कांद्याचे दर तेजीत असतात. परंतु, यंदा नेमकी उलटी परिस्थिती आहे. गेल्या महिनाभरापासून कांद्याचे दर कमालीचे कोसळले आहेत. शेतकऱ्यांना उत्पादन खर्चदेखील मिळत नाही. बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आवक ६९९ क्विंटल होती. बाजारभाव कमीत कमी १५० ते ६५० क्विंटल होता, अशी माहिती बाजार समितीचे सहायक सचिव प्रदीप निलाखे यांनी दिली. कांद्याला दर कमी मिळत असल्यामुळे कांदाचाळीत साठवणूक करण्यास शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे.(प्रतिनिधी)