एसटी तिकिटांच्या किमतीत १ रुपयाने वाढ होणार
By Admin | Published: March 25, 2016 02:43 AM2016-03-25T02:43:15+5:302016-03-25T02:43:15+5:30
एसटी तिकिटांच्या किमतीत सरसकट १ रुपयाने वाढ होणार आहे. अपघात सहायता निधी योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार असून, या योजनेद्वारे तिकिटांच्या किमतीवर
मुंबई : एसटी तिकिटांच्या किमतीत सरसकट १ रुपयाने वाढ होणार आहे. अपघात सहायता निधी योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार असून, या योजनेद्वारे तिकिटांच्या किमतीवर १ रुपया सेस लागू केला जाईल. त्याची अंमलबजावणी १ एप्रिलपासून केली जाणार असल्याची माहिती एसटीतील सूत्रांकडून देण्यात आली.
अपघातातील मृत प्रवाशाच्या वारसांना ३ लाख रुपये आणि जखमी प्रवाशाला ४0 हजार रुपयांपासून ७५ हजार रुपयांपर्यंत नुकसानभरपाई महामंडळ देते. मात्र यात वाढ करण्याचा निर्णय एसटी महामंडळाकडून घेण्यात आला होता. त्यानुसार मृत प्रवाशांच्या वारसांना १० लाख रुपये देण्याची योजना आखण्यात आली. तर जखमी प्रवाशांना देण्यात येणाऱ्या मदतनिधीतही वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु तिकिटांवरच सेस लावून वाढीव निधी देण्याची योजना आखण्यात आली. त्यासाठी तिकिटावरच सरसकट १ रुपयाची वाढ लागू करण्यात येणार आहे. १ एप्रिलपासून अंमलबजावणी करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. (प्रतिनिधी)
याबाबत एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रणजीतसिंह देओल यांच्या मोबाइलवर वारंवार संपर्क साधला असताही त्यांनी प्रतिसाद दिला नाही.