अमरावतीत भाऊगर्दी, यवतमाळात प्रतिष्ठा पणाला लागली

By admin | Published: August 14, 2014 01:18 AM2014-08-14T01:18:16+5:302014-08-14T01:18:16+5:30

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अमरावती जिल्ह्यात इच्छुकांची भाऊगर्दी, मातब्बर राजकारण्यांच्या यवतमाळमध्ये प्रस्थापितांची प्रतिष्ठा पणाला, तर महात्मा गांधी यांच्या वास्तव्याने पुनित

Pride in Amravati Bhaugardi, Yavatmal took place | अमरावतीत भाऊगर्दी, यवतमाळात प्रतिष्ठा पणाला लागली

अमरावतीत भाऊगर्दी, यवतमाळात प्रतिष्ठा पणाला लागली

Next

माणिकराव ठाकरेंची परीक्षा
गणेश देशमुख - अमरावती
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अमरावती जिल्ह्यात इच्छुकांची भाऊगर्दी, मातब्बर राजकारण्यांच्या यवतमाळमध्ये प्रस्थापितांची प्रतिष्ठा पणाला, तर महात्मा गांधी यांच्या वास्तव्याने पुनित झालेल्या वर्धा जिल्ह्यात सर्वच राजकीय पक्षांमध्ये बंडाचे निशाण आतापासूनच फडकू लागले आहेत.
माजी राष्ट्रपती पुत्राचा विधानसभा मतदारसंघाचा समावेश असलेल्या अमरावती जिल्ह्यातील आठपैकी काँग्रेसचे चार, अपक्ष तीन आणि शिवसेनेचा एक आमदार आहे. काँग्रेसची ताकद या जिल्ह्यात पूर्वीपासूनच जशी मोठी, भांडणेही तशीच टोकाची! या निवडणुकीतही हा मुद्दा आहेच. काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या अमरावती, मेळघाट, तिवसा आणि चांदूररेल्वे यापैकी अमरावतीत माजी राज्यमंत्री सुनील देशमुखांची एन्ट्री झाल्यास लढत चुरशीची होणार हे निश्चित़ बडनेऱ्यात घमासान होईल. राष्ट्रवादीतून निष्कासित करण्यात आलेल्या संजय व सुलभा खोडके यांच्या अस्तित्त्वाची लढाई या मतदारसंघात आहे. अचलपूर मतदारसंघात काँग्रेस, राष्ट्रवादी दावेदारीसाठी आमनेसामने उभी ठाकली आहे. येथेही उष्ण वारे वाहतील. तिवसा मतदारसंघातून यशोमती ठाकूर आणि चांदूररेल्वेतून वीरेंद्र जगताप यांना तगडे प्रतिस्पर्धी विरोधी पक्षात दिसत नाहीत. नवेच्छुकांना हे दोन्ही मतदारसंघ म्हणूनच विशेषत्त्वाने खुणावत आहेत. दर्यापूरचे शिवसेनेचे विद्यमान आमदार अभिजित अडसूळ यांच्या अनुसूचित जाती या राखीव मतदारसंघातही तुल्यबळ असा प्रतिस्पर्धी नाही. आदिवासीक्षेत्र असलेल्या मेळघाटात केवळराम काळे यांच्यासाठी वातावरण सकारात्मक असल्याचे चित्र आहे़
यवतमाळात प्रस्थापितांची प्रतिष्ठा पणाला!
राज्यभरातील काँग्रेसची धुरा ज्यांच्या खांद्यावर आहे ते प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे यवतमाळचे. पूर्वीचा दारव्हा, आताचा दिग्रस हा त्यांचा मतदारसंघ. २००४ मध्ये माणिकरावांना पराभूत करून शिवसेनेचे संजय राठोड दारव्ह्यातून निवडून आले होते. दिग्रसचे विद्यमान आमदार संजय राठोडच आहेत़ २००९ सालची निवडणूक माणिकरावांनी लढविली नव्हती. पक्षावर घराणेशाहीचा आरोप होत असला तरीही काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना त्यांचे चिरंजीव राहुल यांचे पुनर्वसन करण्यासाठी दिग्रस किंवा यवतमाळ मतदारसंघ हवा आहे. या मतदार संघात दीड वर्षांपूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीत नंदीनी नीलेश पारवेकर या निवडून आल्या होत्या. त्यांचा उमेदवारीचा पत्ता कापणे सोपे नाही.
यवतमाळमध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत; परंतु कार्यकारिणी नाही. ६० वर्षांत पहिल्यांदाच जिल्हा परिषदेतील सत्ता गमावण्याची नामुष्की काँग्रेसवर ओढावली. यवतमाळात एकूण सात मतदारसंघांपैकी पाच काँग्रेस, एक शिवसेना आणि एक राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहे. आहे ती संख्या राखता आली तरी माणिकरावांनी कमविले, अशी एकूण स्थिती आहे. विरोधी पक्ष बळकट नाहीत. संजय राठोड शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आहेत. पक्ष वाढविण्याच्या भानगडीत आपण संपू नये याची दक्षता बाळगून त्यांनी पक्षकार्य केलेले आहे.
पश्चिम विदर्भात सर्वाधिक लाल दिवे याच जिल्ह्यात आहेत. शिवाजीराव मोघे आणि मनोहरराव नाईक हे मंत्रिमंडळात आहेत. वसंत पुरके हे विधानसभेचे उपसभापती आहेत. असे असले तरी आगामी निवडणुकीत यवतमाळ जिल्ह्यात प्रस्थापितांची प्रतिष्ठा पणाला लागणार हे खरे !

Web Title: Pride in Amravati Bhaugardi, Yavatmal took place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.