देशी गोसंवर्धनाचा गौरव!
By Admin | Published: April 4, 2016 03:31 AM2016-04-04T03:31:26+5:302016-04-04T03:31:26+5:30
गेल्या चार पिढ्या पुणे जिल्ह्यात लोणी देवकर येथे देशी गायींचे संवर्धन करणारे रज्जाक पठाण यांना लोकसेवा-समाजसेवा विभागातील १ लाख रुपयांचा पुरस्कार मिळाला.
मुंबई : गेल्या चार पिढ्या पुणे जिल्ह्यात लोणी देवकर येथे देशी गायींचे संवर्धन करणारे रज्जाक पठाण यांना लोकसेवा-समाजसेवा विभागातील १ लाख रुपयांचा पुरस्कार मिळाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
रज्जाक पठाण यांनी आपल्या गोठ्यात दररोज १२ लीटर दूध देणारी खिल्लार गाय तसेच २८ लीटर दूध देणाऱ्या गीर गायींची पैदास केली आहे. जातिवंत गायींची पैदास करून त्या गायी ते शेतकऱ्यांना दान करतात. भाकड देशी गायी दुभत्या बनवून त्यांनी शेतकऱ्यांच्या दावणीला बांधल्या. ६५० विधवा महिलांच्या मुलांना ते शिक्षणासाठी मदतही करतात. ‘मुस्लीम गोपालक’ अशी त्यांची ओळख आजच्या काळातली नसून गेल्या तीन पिढ्यांची आहे. या पुरस्कारामुळे आम्हाला खूप आनंद झाला. निरोगी राहायचे असेल, तर देशी गायी पाळणे गरजेचे आहे. ज्याला गाय पाळता येत नाही, त्याने देशी गायीचे दूध तरी प्यायले पाहिजे. सुदृढ भारत घडवायचा असेल व निरोगी राहायचे, तर गायी पाळण्याला पर्याय नाही. ‘लोकमत’ने पारितोषिक म्हणून १ लाख रुपयांची रक्कम दिली, त्यात मी माझे १ लाख रुपये टाकून मुख्यमंत्री साहाय्यता निधीला देत आहे, असे रज्जाक पठाण यांनी जाहीर केले.