अभिमान गीताचे सातवे कडवे कापल्याने गदारोळ, विधानसभेत पडसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 03:02 AM2018-02-28T03:02:13+5:302018-02-28T03:02:13+5:30
मराठी अभिमान गीतातील शेवटचे कडवे वगळून आज ते विधानभवन प्रांगणात गायले गेल्याने मराठी भाषा गौरव दिनीच मराठी अभिमान गीताची गळचेपी झाली, असा आरोप करीत विरोधी पक्ष सदस्यांनी आज विधानसभेत गोंधळ घातला. या गोंधळात अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी कामकाज एक वेळा तहकूब केले.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मराठी अभिमान गीतातील शेवटचे कडवे वगळून आज ते विधानभवन प्रांगणात गायले गेल्याने मराठी भाषा गौरव दिनीच मराठी अभिमान गीताची गळचेपी झाली, असा आरोप करीत विरोधी पक्ष सदस्यांनी आज विधानसभेत गोंधळ घातला. या गोंधळात अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी कामकाज एक वेळा तहकूब केले.
विधानभवन प्रांगणात आयोजित कार्यक्रमात संगीतकार कौशल इनामदार आणि त्याच्या चमूने कविवर्य सुरेश भट यांचे ‘लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी...’ हे मराठी अभिमान गीत गायले; पण ते सहा कडव्यांचेच होते. त्यातील,
पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरात हाल सोसते मराठी
हे असे कितीक खेळ पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी
हे सातवे कडवे त्यांनी गायले नाही. सभागृहाचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील आदींनी हा मुद्दा उपस्थित केला.
कविवर्य सुरेश भट यांच्या रूपगंधा काव्यसंग्रहाच्या शेवटच्या आवृत्तीत मराठी भाषेच्या अभिमान गीताची सहाच कडवी प्रकाशित करण्यात आली आहेत. सातवे कडवे हे त्यांनी एका कार्यक्रमात म्हटले होते पण ते त्यांनी स्वत:ही ‘रूपगंधा’मध्ये समाविष्ट केलेले नव्हते, असे स्पष्टीकरण तावडे यांनी दिले. या मुद्द्यावरून जयंत पाटील आणि मुख्यमंत्र्यांमध्ये शाब्दिक खडाजंगीही झाली.
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आज विधानसभेत अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी तर विधान परिषदेत सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी अभिनंदनाचा ठराव मांडला. मराठी भाषा अधिक लोकाभिमुख होऊन ती ज्ञानभाषा व्हावी यासाठी शासनाने मराठी भाषेच्या विकास प्रक्रियेस अधिक चालना द्यावी, अशी शिफारस करीत विधानसभा अध्यक्षांनी अभिनंदनाचा ठराव मांडला. तो एकमताने संमत करण्यात आला. मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी आणि या भाषेच्या संवर्धनासाठी अविरतपणे योगदान देणाºया सर्व साहित्यिकांचे दोन्ही सभागृहांनी ठरावाद्वारे अभिनंदन केले.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी लागणारे पुरावे गोळा करण्यात आले असून केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देणारच, अशी ग्वाही शिक्षणमंत्री तावडे यांनी दिली.
मराठी भाषा दिनानिमित्त आज विधानभवनाच्या प्रांगणात, मराठी भाषा विभाग व वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिन, मराठी अभिमान गीत गाऊन अभिनव पद्धतीने साजरा करण्यात आला. या वेळी प्रसिद्ध गायक कौशल इनामदार आणि चमूने मराठी अभिमान गीताचे मान्यवरांसमवेत समूह गायन केले.
ही तर मराठीची गळचेपी-
मराठी भाषा विभागाला पूर्णवेळ सचिव नाही. विभागातील ४० टक्के पदे रिक्त आहेत. मंत्रालयातील अनेक अधिकारी इंग्रजीतून टिप्पणी टाकतात. मुख्यमंत्री अनेकदा हिंदी, इंग्रजीतून बोलतात. राज्यात मराठीची गळचेपी चालू आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेत केली.