प्राथमिक गुणवत्ता यादी आज जाहीर होणार
By admin | Published: June 21, 2016 12:43 AM2016-06-21T00:43:07+5:302016-06-21T00:43:07+5:30
पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयांतील अकरावी प्रवेशासाठी आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविली जात असून, मंगळवारी (दि. २१) सकाळी ११ वाजता प्राथमिक गुणवत्ता
पुणे : पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयांतील अकरावी प्रवेशासाठी आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविली जात असून, मंगळवारी (दि. २१) सकाळी ११ वाजता प्राथमिक गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या हरकती व सूचना येत्या २१ व २२ जूनपर्यंत स्वीकारल्या जाणार आहेत. तसेच अद्याप आॅनलाइन प्रवेशअर्ज न भरणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या दोन दिवसांत अर्ज भरता येणार आहे, असे पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक दिनकर टेमकर यांनी सांगितले.
आॅनलाइन प्रवेशासाठी ७१ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. अर्ज केलेल्या सर्व विद्यार्थ्यांची प्राथमिक गुणवत्ता यादी मंगळवारी प्रसिद्ध केली जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या अर्जात दुरुस्ती असतील, त्यांना येत्या २१ व २२ जून रोजी हरकती व सूचना देता येतील. येत्या २३ जून रोजी अकरावीच्या मुख्य ९ केंद्रांवर आणि या केंद्रांच्या अंतर्गत येणाऱ्या मार्गदर्शन केंद्रांवर जाऊन विद्यार्थ्यांना अर्जात दुरुस्त्या करता येतील. दुरुस्तीसाठी येणा-या विद्यार्थ्यांना पहिल्या व दुसऱ्या भागातील सर्व माहिती पुन्हा नव्याने भरावी लागेल.
टेमकर म्हणाले, ‘‘अकरावी प्रवेशासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना दुरुस्तीची संधी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांना केवळ पहिलाच भाग भरता आला, काही कारणास्तव प्रवेश अर्जाचा दुसरा भाग भरता आला नाही. तसेच ज्यांना दोन्हीही भाग भरता आले नाहीत, अशा विद्यार्थ्यांना २१ व २२ जून रोजी आॅनलाइन अर्ज भरता येईल़
कॉलेजमधील प्रवेश
२७ जूनला समजणार
आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेंतर्गत २१ जून रोजी विद्यार्थ्यांची प्राथमिक यादी जाहीर केली जाणार आहे. त्यातून विद्यार्थ्यांना एकूण विद्यार्थ्यांमध्ये आपला क्रमांक कुठे आहे हे समजू शकेल. आपल्याला कोणत्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला, ही माहिती २७ जून रोजी प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम गुणवत्ता यादीतूनच समजू शकणार आहे.विद्यार्थ्यांना पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयच्या संकेतस्थळावर स्वत:च्या आॅनलाइन प्रवेश अर्जाचा क्रमांक टाकून आपली माहिती तपासता येईल. त्यात वैयक्तिक माहिती, दहावीत मिळालेले गुण आदी गोष्टी तपासता येतील. तसेच अर्ज भरलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी आपला क्रमांक कितवा आहे, हेसुद्धा विद्यार्थ्यांना समजू शकेल. अर्जात काही दुरुस्ती असल्यास विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन केंद्रांना भेट द्यावी, असे शिक्षण सहायक संचालक मीनाक्षी राऊत यांनी सांगितले.