प्राथमिक शिक्षकांच्या बदलीची प्रक्रिया सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 05:59 AM2019-05-22T05:59:44+5:302019-05-22T05:59:47+5:30
आॅनलाईन माहिती भरण्याची सूचना : ३० मेपर्यंत मुदत
कोल्हापूर : प्राथमिक शिक्षकांच्या बदलीची प्रक्रिया सुरू झाली असून, यंदा केवळ बदलीपात्रच नव्हे तर सर्वच शिक्षकांना आपली माहिती भरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हा वगळून इतरांसाठी ही माहिती भरण्यासाठी ३० मेपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
गेल्या दोन वर्षांप्रमाणेच यंदाही सुगम आणि दुर्गम आॅनलाईन पद्धतीने बदल्या होणार आहेत. यासाठी २० मेपर्यंत बदलीपात्र शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध करण्याच्या सूचना प्रत्येक पंचायत समितीला देण्यात आल्या होत्या. त्यानुसार आता पुढच्या प्रक्रियेविषयी ग्रामविकास विभागाने मंगळवारी पत्राद्वारे मार्गदर्शन केले आहे. घोषित केलेल्या याद्यांची माहिती २५ मेपर्यंत संगणक प्रणालीमध्ये भरावयाची असून, २५ मे रोजी ही सुविधा बंद करण्यात येणार आहे. तसेच २५ ते ३० मे या कालावधीत शिक्षकांना फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
प्रत्येक वर्षी संगणक प्रणालीवर मॅपिंग करावे लागू नये यासाठी यंदा सर्व शिक्षकांचे मॅपिंग करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे केवळ बदलीपात्र शिक्षकांनीच नव्हे तर सर्वच शिक्षकांनी आपली माहिती भरणे बंधनकारक करण्यात आले आहे.
जे शिक्षक ३१ मेपूर्वी सेवानिवृत्त होत आहेत, त्यांना संगणक प्रणालीत मॅप करू नये. तसेच अशा शिक्षकांचे पद संगणक प्रणालीमध्ये रिक्त म्हणून नमूद करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
शून्य शिक्षक असलेल्या शाळांना मॅप करण्याची सुविधा संगणक प्रणालीमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. अशा शाळा शून्य शिक्षक म्हणून मॅप केल्याशिवाय त्यांची रिक्त जागा व समानीकरणासाठी ठेवावयाची रिक्त पदे संगणक प्रणालीमध्ये नमूद करता येणार नाहीत, असेही ग्रामविकास विभागाच्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
कारवाई झालेल्या शिक्षकांबद्दल...
चुकीची माहिती भरून मागील वर्षी बदली करून घेतलेल्या दोषी शिक्षकांना संगणक प्रणालीमध्ये मॅप करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्तरावरून यापूर्वीच कारवाई झालेल्या शिक्षकांना सुविधेमध्ये मॅप करू नये. दोषी असलेल्या व कोणताही कारवाई न झालेल्या शिक्षकांना या सुविधेअंतर्गत मॅप करावे. दोषी शिक्षकांबाबतीत संबंधित शाळेत एक जागा रिक्त दाखविणे आवश्यक आहे.