प्राथमिक शिक्षकांना मतदानाचा हक्क मिळावा
By admin | Published: May 13, 2014 07:10 PM2014-05-13T19:10:57+5:302014-05-13T19:13:40+5:30
संघाची मागणी * अन्यथा न्यायालयात जाण्याचा इशारा
अकोला: अमरावती विभागीय शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत प्राथमिक शिक्षकांना मतदानाचा हक्क मिळावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य खासगी प्राथमिक शिक्षक संघाने मंगळवारी मुख्य निवडणूक आयुक्तांना पाठविलेल्या पत्रात केली आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर आता अमरावती विभागीय शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. प्रत्येक शिक्षक संघटना व राजकीय पक्ष चाचपणी करीत आहेत. निवडणुकीसाठी प्रशासनानेही कंबर कसली असून, नोंदणी आणि पडताळणीच्या प्रक्रियेला वेग आला आहे. यासाठी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयातून हरकती मागविण्यात येत आहे.
दरम्यान, महाराष्ट्र राज्य खासगी प्राथमिक शिक्षक संघाने निवडणुकीत प्राथमिक शिक्षकांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी पुढाकार घेतला आहे. शिक्षकांच्या समस्या मांडण्याकरिता शिक्षकांचा प्रतिनिधी विधान परिषदेत पाठविण्यात येतो; मात्र शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत प्राथमिक शिक्षक हे मतदार नाहीत. परिणामस्वरूप शिक्षकांच्या समस्यांवर सभागृहात गांभीर्याने चर्चा होत नाही, असे खासगी शिक्षक संघाचे अध्यक्ष मनीष गावंडे यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे निवडणुकीत प्राथमिक शिक्षकांना मतदानाचा हक्क मिळावा, अशीही मागणी त्यांनी केली आहे.