प्राथमिक शिक्षकांचे पगार दोन महिने रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2017 01:24 AM2017-04-04T01:24:25+5:302017-04-04T01:24:25+5:30
जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे पगार दोन महिन्यांपासून रखडले आहेत
बारामती : जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे पगार दोन महिन्यांपासून रखडले आहेत. त्यामुळे शिक्षकांमध्ये असंतोष पसरला आहे. रखडलेले पगार तातडीने करावेत; अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीचे अध्यक्ष नंदकुमार होळकर यांनी दिला आहे.
जिल्ह्यातील शिक्षकांचे पगार फेब्रुवारीपासून मिळालेले नाहीत. मार्च महिना उलटून एप्रिल महिना सुरू झाला आहे. किमान फेब्रुवारी महिन्याचा तपास होणे अपेक्षित होते. मात्र, तो पगारदेखील न झाल्याने शिक्षकांना आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. अनेक शिक्षकांना वेळेवर हप्ते भरता आले नाहीत. मोठ्या प्रमाणात दंड, व्याजाला सामोरे जावे लागत आहे.
एलआयसी, फंडाचे हप्ते वेळेवर जात नसल्याने शिक्षकांना मिळणाऱ्या व्याजापासून वंचित राहावे लागणार आहे. शिक्षकांना मुलांच्या शैक्षणिक कामासाठी आवश्यक असणारे पैसेदेखील पगार नसल्याने उपलब्ध झाले नाहीत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना उसनवार करण्याची वेळ आली आहे. तसेच, विविध प्रकारची पुरवणी बिले वर्षभरापासून प्रलंबित आहेत. मंजूर होऊनदेखील शिक्षकांना अद्याप ती मिळालेली नाहीत. दरमहा शिक्षकांचे पगार वेळेवर होत नाहीत. प्रशासनाने पगार वेळेवर होण्यासाठी नियोजन करावे, अशी मागणी समितीच्या वतीने करण्यात येणार असल्याचे होळकर यांनी सांगितले. (वार्ताहर)