पंतप्रधान देशाचे की भाजपाचे
By admin | Published: June 25, 2016 12:54 AM2016-06-25T00:54:24+5:302016-06-25T00:54:24+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुण्यात होत असलेल्या स्मार्ट सिटी योजनेच्या शुभारंभाचा कार्यक्रम भारतीय जनता पक्षाकडून हायजॅक करण्यात आल्याचा आरोप महापौरांसह
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुण्यात होत असलेल्या स्मार्ट सिटी योजनेच्या शुभारंभाचा कार्यक्रम भारतीय जनता पक्षाकडून हायजॅक करण्यात आल्याचा आरोप महापौरांसह सर्वच राजकीय पक्षांकडून करण्यात येत आहे. नगरविकास मंत्रालयाकडून महापौरांचा अपमान करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपा वगळता सर्वच राजकीय पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला असून, पंतप्रधान देशाचे आहेत की फक्त भाजपाचे, असा सवाल त्यांच्याकडून उपस्थित करण्यात आला आहे.
एकही पदाधिकारी उपस्थित राहणार नाही
महापौरांचा अपमान हा पुणेकरांचा अपमान आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही पदाधिकारी, खासदार, आमदार, नगरसेवक या कार्यक्रमाला जाणार नाहीत. निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
- अंकुश काकडे, प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस
महापौरांना चुकीची वागणूक
महापौर प्रशांत जगताप यांना देण्यात आलेली वागणूक चुकीची आहे. काँग्रेस पक्षाने यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात निदर्शने करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानुसार कार्यक्रमाच्या ठिकाणी आंदोलन करण्यात येणार आहे. पंतप्रधान हे केवळ भाजपाचे नाहीत, तर ते देशाचे आहेत, आम्ही या कार्यक्रमात सहभागी होणार नाही.
- अरविंद शिंदे, गटनेते, काँग्रेस
महापौरांच्या बाबतीत घडलेला प्रकार चुकीचा आहे. महापौर म्हणून त्यांना उचित मान दिला गेला नाही. स्मार्ट सिटीच्या कार्यक्रमामध्ये आम्ही सहभागी होणार नाही.
- प्रकाश ढोरे,
राज्य उपाध्यक्ष, मनसे
रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या (आठवले गट) एकाही पदाधिकाऱ्याला स्मार्ट सिटीच्या कार्यक्रमाचा पास देण्यात आलेला नाही. शहरी गरिबांचा कोणताही विचार करण्यात आलेला नाही. त्यामुळे या कार्यक्रमावर आमचा बहिष्कार आहे.
- सिद्धार्थ धेंडे,
गटनेता, रिपाइं
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत कोणत्याही मोठ्या प्रकल्पाचा पत्ता नाही, तर मोदी पुण्यात येऊन कशाचे उद्घाटन करणार आहेत? स्मार्ट सिटी म्हणजे निव्वळ पुणेकरांची दिशाभूल करण्याचे काम भाजपा करत आहे. त्यामुळे शिवसेना उपस्थित राहू इच्छित नाही.
- विनायक निम्हण, शहराध्यक्ष, शिवसेना