"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2024 02:25 PM2024-09-20T14:25:49+5:302024-09-20T14:26:36+5:30
PM Modi on Uddhav Thackeray : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ध्यातील कार्यक्रमात काँग्रेसवर घणाघाती हल्ला चढवला. गणपती पूजेच्या मुद्द्यावरून झालेल्या टीकेला उत्तर देताना मोदींनी ठाकरे-पवारांवर उल्लेख न करता निशाणा साधला.
PM Modi Latest News : पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्या हस्ते वर्ध्यात विविध योजना आणि प्रकल्पाचे उद्घाटन झाले. यावेळी बोलताना मोदींनी काँग्रेसवर टीकेचे बाण डागले. काँग्रेसचे शाही कुटुंब देशातील सगळ्यात भ्रष्ट कुटुंब असल्याचे मोदी म्हणाले. त्याचबरोबर कर्नाटकातील गणपती मूर्ती प्रकरणावरून मोदींनी उद्धव ठाकरेंना नाव न घेता लक्ष्य केले.
मोदी म्हणाले, "तुम्ही बघा, आज काँग्रेसच्या लोकांची भाषा, त्यांचे बोलणे, परदेशात जाऊन त्यांचे देशविरोधातील अजेंडा, समाजाला तोडणे, देशाला तोडण्याची भाषा करणे, भारतीय संस्कृती आणि श्रद्धेचा अपमान करणे, ही ती काँग्रेस आहे, जिला तुकडे-तुकडे गँग आणि अर्बन नक्सल चालवत आहेत."
"आज देशात सर्वात बेईमान आणि सर्वाधिक भ्रष्ट पक्ष कुठला असेल, तर तो काँग्रेस आहे. देशातील सर्वात भ्रष्ट कुटुंब कुठले असेल, तर ते काँग्रेसचे शाही कुटुंब आहे. ज्या पक्षात आपल्या श्रद्धेचा आणि संस्कृतीचा थोडासाही सन्मान केला जात असेल, तर तो पक्ष कधी गणपती पूजेचा विरोध करू शकत नाही", अशा शब्दात मोदींनी काँग्रेसला लक्ष्य केले.
काँग्रेसला गणपती पूजेची चीड -मोदी
"आजची काँग्रेस गणपती पूजेचाही तिरस्कार करते. महाराष्ट्राची भूमी साक्षीदार आहे की, स्वातंत्र्य लढ्यात लोकमान्य टिळकांच्या नेतृत्वात गणपती उत्सव महाराष्ट्राच्या एकतेचा उत्सव बनला होता. गणेश उत्सवात प्रत्येक समाज, प्रत्येक वर्गातील लोक एकत्र येत होते. त्यामुळे काँग्रेसला गणपती पूजबद्दल चीड आहे", असा आरोप मोदींनी केला.
"मी गणपती पूजेला गेलो, तर काँग्रेसचे ध्रुवीकरणाचे भूत उठले. काँग्रेसने गणपती पूजेचा विरोध केला. ध्रुवीकरणासाठी काँग्रेस काहीही करत आहे", असेही पंतप्रधान मोदी वर्ध्यातील सभेत म्हणाले.
पोलिसांनी गणपती मूर्ती घेतली ताब्यात, मोदींचे ठाकरेंवरही टीकेचे बाण
कर्नाटकात आंदोलन करणाऱ्यांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडील गणपतीची मूर्ती गाडीत ठेवली होती. त्या प्रकाराबद्दल बोलताना मोदी म्हणाले, "तुम्ही बघितले असेल की, कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारने गणपती बाप्पाालाच कैद केले. गणपतीच्या ज्या मूर्तीची लोक पूजा करत होते, ती पोलिसांच्या गाडीत ठेवली गेली. महाराष्ट्र गणपतीची आराधना करत होता आणि कर्नाटकात गणपतीची मूर्ती पोलीस व्हॅनमध्ये होती."
"गणपतीच्या अपमानामुळे पूर्ण देशात आक्रोश आहे. मी अचंबित आहे की, यावर काँग्रेस मित्रपक्षांच्या तोंडांनाही टाळे लागले आहेत. त्यांच्यावरही काँग्रेसच्या संगतीचा असा परिणाम झालाय की, गणपतीच्या अपमानाचा विरोध करण्याची त्यांच्यात हिंमत राहिलेली नाही", असे म्हणत मोदींनी उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्षपणे लक्ष्य केले.