पंतप्रधान मोदी संत तुकारामांच्या भेटीला आले आणि एकनाथाला घेऊन गेले - छगन भुजबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 01:20 PM2022-06-22T13:20:49+5:302022-06-22T13:33:32+5:30
Chhagan Bhujbal on Maharashtra Political Crisis: छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी संत तुकारामाच्या भेटीला आले आणि एकनाथाला घेऊन गेले, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडत असल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडामुळे शिवसेनेचे वरिष्ठ नेतृत्त्व कमालीचे अस्वस्थ झाले आहे. एकनाथ शिंदे यांनी पक्षाशी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना महाराष्ट्राबाहेर नेलं आहे. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर होण्याची चिन्हे आहेत. अशातच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या एका ट्विटमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी संत तुकारामाच्या भेटीला आले आणि एकनाथाला घेऊन गेले, अशी प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी देहू येथे झालेल्या एका कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहिले होते. हाच धागा पकडत छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
छगन भुजबळ म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी संत तुकारामांच्या भेटीला देहूत आले आणि एकनाथाला घेऊन गेले. काय काय होते ते आधी बघू या. सरकारमध्ये राहणे, सरकार पडणे, नवीन पद्धतीने लढणे, मताधिक्य आणणे या गोष्टी आमच्यासाठी काही नवीन नाहीत. शरद पवार यांना असे प्रसंग नवीन नाही." तसेच, छगन भुजबळ यांनी राज्यातील राजकीय स्थितीवर विस्तारीत भाष्य करणे टाळले. मात्र, काही काळ वाट पाहू सर्व चित्र स्पष्ट होईल, असे ते म्हणाले.
पत्रकारांनी राज्यात मध्यावधी निवडणुका लागणार का असे विचारले असता त्यांनी सांगितले की, मध्यावधी लागू दे, उद्या लागू दे अथवा परवा लागू द्यात. राजकीय पक्षांनी नेहमीच निवडणुकीसाठी तयार राहिले पाहिजे. सरकारवर संकट येईल असे आम्हाला वाटले नव्हते. शरद पवार यांच्या बरोबर आमची बैठक होईल. त्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
आज महाविकासआघाडी सरकारची आज एक मंत्रिमंडळ बैठक पार होणार आहे. या बैठकीबाबत छगन भुजबळ यांना विचारले असता, सर्व काही ठिक असल्याचे वाटत आहे. मला आजचीही मंत्रिमंडळ बैठक नेहमीचीच असल्यासारखे वाटत आहे. राज्यातील राजकीय घडामोडींवर मी भाष्य करणार नाही. आमचे सर्वोच्च नेते शरद पवार आज मुंबईत आहेत. त्यांची बैठक होईल. त्यानंतर पक्षाची भूमिका ठरेल, असे छगन भुजबळ यांनी सांगितले. याशिवाय, शिवसेनेत जे घडले ते अनपेक्षित आहे. सर्व काही सुरळीत आहे, असे वाटत असताना अचानकच असे काही घडले, असेही छगन भुजबळ म्हणाले.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेसह राज्यातील राजकारणामध्ये खळबळ उडाली आहे. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारविरोधात बंड पुकारणारे एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे इतर शिवसेना आमदार गुवाहाटी येथे दाखल झाले आहेत. यानंतर संजय राऊत यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन "महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधान सभा बरखास्तीच्या दिशेने.." असे ट्विट केले आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी अप्रत्यक्षरित्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याचे संकेत दिले असल्याचे बोलले जात आहे.