नागपूरचा यश बनला पंतप्रधानांचा अतिथी
By admin | Published: January 19, 2015 12:51 AM2015-01-19T00:51:53+5:302015-01-19T00:51:53+5:30
सीबीएसई १२ वीच्या परीक्षेत देशात दुसरा क्रमांक पटकावून नागपूरचा लौकिक वाढविणाऱ्या यश कोटेचा या विद्यार्थ्यांने पुन्हा एकदा नागपूरची मान उंचावली आहे. पंतप्रधान कार्यालयाच्या
गणराज्य दिन सोहळ्यात सहभाग : पंतप्रधान कार्यालयाचे निमंत्रण
नागपूर : सीबीएसई १२ वीच्या परीक्षेत देशात दुसरा क्रमांक पटकावून नागपूरचा लौकिक वाढविणाऱ्या यश कोटेचा या विद्यार्थ्यांने पुन्हा एकदा नागपूरची मान उंचावली आहे. पंतप्रधान कार्यालयाच्या निर्देशानुसार मनुष्य बळ विकास मंत्रालयाने गणराज्य दिनी दिल्ली येथे होणाऱ्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी यश कोटेचा याला निमंत्रण पाठविले आहे. विशेष म्हणजे यशला ‘पीएम बॉक्स’मध्ये बसून परेडचे निरीक्षण करण्याची संधी मिळणार आहे. ही बाब नागपूरसाठी गौरवास्पद मानली जात आहे.
यावर्षीच्या गणराज्य दिन सोहळ्यात अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा विशेष अतिथी म्हणून सहभागी होणार आहे. त्यामुळे ऐतिहासिक महत्त्व लाभलेल्या या सोहळ्यात यश हा पंतप्रधानांकडून निमंत्रित अतिथी म्हणून सहभागी होईल. या कार्यक्रमात यशचा सत्कारही केला जाणार आहे. पंतप्रधानांसोबत गुणवंत विद्यार्थ्यांचे फोटोसेशन होणार असून त्यातही यशचा सहभाग असेल. याशिवाय दिल्ली येथे २५ ते २८ जानेवारी दरम्यान गुणवंत विद्यार्थ्यांसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन वर्ग, महत्त्वाच्या व्यक्तींसोबत भेट व चर्चा, दिल्लीतील प्रमुख स्थळांना भेटी आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्यातही यश सहभागी होईल.
यशने सीबीएसई १२ वीच्या परीक्षेत ९८.५ टक्के गुण मिळविले होते. तो देशात दुसरा टॉपर ठरला होता. त्याने मिळविलेल्या यशाची दखल घेत त्याला केंद्र सरकारने त्याची गणराज्य दिन सोहळ्यासाठी पंतप्रधानांच्या अतिथींमध्ये निवड केली आहे. यश सध्या चार्टर्ड अकाऊंटंटची तयारी करीत आहे. (प्रतिनिधी)