पंतप्रधान नरेंद्र मोदी १४ एप्रिल रोजी दीक्षाभूमीवर
By Admin | Published: April 4, 2017 07:47 PM2017-04-04T19:47:57+5:302017-04-04T19:47:57+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी १४ एप्रिल रोजी दीक्षाभूमीवर येत आहेत. या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असल्यामुळे ते दीक्षाभूमीवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या
>ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 04 - पंतप्रधान नरेंद्र मोदी १४ एप्रिल रोजी दीक्षाभूमीवर येत आहेत. या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असल्यामुळे ते दीक्षाभूमीवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थीकलशाचे दर्शन घेणार आहेत. तसेच, कोराडी येथील प्रत्येकी ६६० मेगावॅटच्या तीन युनिटच्या लोकार्पणासह विविध योजनांचे लोकार्पण व भूमीपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १४ एप्रिल रोजीचा नागपूर दौरा प्रशासकीय पातळीवर अद्याप निश्चित झालेला नाही. मात्र, या तारखेलाच दौरा आहे, असे मानून प्रशासन व भाजपा पदाधिका-यांची चमू कामाला लागली आहे. मोदी यांच्या कार्यक्रमाला जाहीर सभेचे स्वरुप देण्याची तयारी सुरू आहे. ही सभा सायंकाळी मानकापूर क्रीडा संकुल किंवा रेशीमबाग मैदानावर घेण्याचा विचार सुरू आहे. अद्याप जागा निश्चित झालेली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते कोराडी वीज प्रकल्पातील नवनिर्मित तीन युनिट, चंद्रपूर व परळी येथील वीज केंद्रातील नवनिर्मित युनिटचेही नागपुरातील कार्यक्रमात लोकार्पण केले जाईल. सोबतच पंतप्रधान आवास योजनेंतर्गत २० शहरात उभारण्यात येणा-या घरांच्या कामांचे भूमीपूजनही त्यांच्या हस्ते केले जाईल. पंतप्रधानांनी ऑनलाइन व्यवहारांसाठी भीम अॅपचे यापूर्वीच लोकार्पण केले होते. डिजिटायशेझनला प्रोत्साहन देण्यासाठी यासंबंधीची आणखी काही घोषणा पंतप्रधान करू शकतात, अशी शक्यता वर्तविली जात आहे.