पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुप्रिया सुळेंना दिली होती मंत्रिपदाची ऑफर - शरद पवारांच्या हवाल्याने सामनाचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2017 09:06 AM2017-09-11T09:06:23+5:302017-09-11T09:38:42+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भाजपाप्रणीत एनडीएमध्ये सहभागी होण्याची ऑफर दिली होती.
मुंबई, दि. 11 - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भाजपाप्रणीत एनडीएमध्ये सहभागी होण्याची ऑफर दिली होती असा दावा शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून करण्यात आला आहे. नरेंद्र मोदींनी खासदार सुप्रिया सुळे यांना मंत्रिपदाची ऑफर दिली होती असे सामनामध्ये म्हटले आहे. सुप्रिया सुळे या शरद पवारांच्या कन्या आहेत. रविवारच्या सामनाच्या लेखातून हा गौफ्यस्फोट करण्यात आला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर लिहीलेल्या लेखातून हा खुलासा केला आहे.
काय म्हटले आहे संजय राऊत यांनी
महाराष्ट्राचे बलदंड नेते श्री. शरद पवार यांच्याशी भेट झाली. देशाच्या राजकारणावर चर्चा झाली. ‘‘आपण भारतीय जनता पक्षाच्या गळाला लागला आहात. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात शरद पवारांना स्थान असल्याच्या बातम्या जोरात होत्या, हे कसे?’’ यावर श्री. पवार म्हणाले, ‘‘हे कसे शक्य आहे? त्या बातम्या म्हणजे मूर्खपणाचा कळस आहे.’’
‘‘मग तुमच्या किंवा राष्ट्रवादी काँगेसच्या बाबतीत बातम्या का येतात?’’
‘‘या अफवा ठरवून पसरवल्या जातात. एकदा श्री. मोदी मला म्हणाले, माझ्या मंत्रिमंडळात मला सुप्रिया हवी आहे. सुप्रिया तेव्हा माझ्याबरोबरच होती. तिने मोदी यांना तोंडावर सांगितले, भारतीय जनता पक्षात जाणारी मी शेवटची व्यक्ती असेन. आमच्या भूमिका स्पष्ट आहेत, पण गोंधळ उडविण्यासाठी अशा बातम्या पसरविल्या जातात.’’
शरद पवार यांचे हे म्हणणे, पण आजही महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे पुढारी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या संपर्कात आहेत. राष्ट्रवादीने फडणवीस मंत्रिमंडळात सामील व्हावे असे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना वाटत असेल व त्यासाठी त्यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांबरोबर गुप्त बैठका सुरू असतील तर त्यामुळे शिवसेनेस विचलित होण्याचे कारण नाही. आज फक्त ४१ आमदारांची ताकद असलेल्या राष्ट्रवादीसाठी उंटाच्या पाठीवरील ती शेवटची काडी ठरेल व भाजपचीही त्यामुळे एकदाची पोलखोल होईल.
मागच्या काही महिन्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजपाचे नेते अनेकदा व्यासपीठावर एकत्र दिसले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस भाजपासोबत जाऊ शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु असते. शिवसेनेकडून सातत्याने केंद्र आणि राज्यातल्या भाजपाच्या नेतृत्वावर आगपाखड सुरु असते. शिवसेना सत्तेत सहभागी असली तरी त्यांना अपेक्षित वाटा न मिळाल्याने शिवसेनेमध्ये नाराजी आहे. उद्या शिवसेनेने पाठिंबा काढलाच तर, राज्यातील सरकार अडचणीत येऊ शकते. अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीची तजवीज करुन ठेवण्याचा भाजपाचा प्रयत्न असावा.