Raj Thackeray: "भारत माता की...", राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आवाज घुमणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 11:14 AM2022-09-20T11:14:37+5:302022-09-20T11:16:40+5:30
राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ' या निवासस्थानी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आवाज घुमणार आहे.
चंद्रपूर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. नागपूरनंतर ते आज चंद्रपूरमध्ये दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी पोहोचले. चंद्रपूरमध्येही राज ठाकरेमनसे पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन पक्ष बांधणीसाठी काही महत्वाचे निर्णय घेणार आहेत. पण या दौऱ्यानंतर राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ' या निवासस्थानी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आवाज घुमणार आहे. हो, हे खरं आहे. पण तुम्ही विचार करत असाल की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राज ठाकरेंची भेट घेणार की काय? पण तसं नाहीय. तर चंद्रपूर दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरे यांना भाजपा नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एक खास गिफ्ट दिलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण ऐकू येणारी एक खास भेटवस्तू सुनील मुनगंटीवार यांनी राज ठाकरे यांना दिली आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर आता मोदींचा आवाज घुमणार आहे. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून राज ठाकरेंना सदिच्छा भेट म्हणून एक स्केच आणि एक पत्र फ्रेम करुन दिलं आहे. त्यासोबतच एक राष्ट्रध्वजाचं सन्मानचिन्ह देण्यात आलं आहे. या सन्मान चिन्हामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचं एक रेकॉर्डेड भाषण ऐकू येतं.
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा अन् भाजपा नेत्यांच्या भेटीगाठी
राज ठाकरे रविवारी नागपूरात दाखल झाले आहेत. नागपुरात त्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर संध्याकाळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं निमंत्रण स्विकारत फुटाळा तलावावरील लेझर शोला उपस्थिती लावली होती. तर दुसऱ्या दिवशी राज ठाकरे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याही भेटीसाठी पोहोचले होते. नागपूरमध्ये काल पत्रकार परिषद घेत राज ठाकरेंनी नागपूरमधील मनसेची सर्व महत्वाची पदं बरखास्त करत असल्याचं जाहीर केलं.
घटस्थापनेदिवशी राज ठाकरे नागपुरातील नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा करणार आहे. पक्षाला १६ वर्ष होऊनही नागपुरात पक्ष वाढीसाठी हवं तसं काम केलं गेलं नाही आणि नव्या चेहऱ्यांना संधी देण्यासाठी पदं बरखास्त करत असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलं. नागपूरनंतर राज ठाकरे दोन दिवस चंद्रपूरमध्ये असणार आहे. चंद्रपुरात राज ठाकरेंनी सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली.