Samruddhi Mahamarg: ‘समृद्धी’च्या दिशेने आज मोठी झेप; पंतप्रधान ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ला हिरवा झेंडा दाखविणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2022 06:32 AM2022-12-11T06:32:58+5:302022-12-11T06:33:16+5:30

सकाळी १०.४५ वाजता समृद्धी महामार्गाच्या झिरो पॉईंटवर समृद्धीच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण

Prime Minister Narendra Modi will flag off Vande Bharat Express and Nagpur-Mumbai Samruddhi Expressway | Samruddhi Mahamarg: ‘समृद्धी’च्या दिशेने आज मोठी झेप; पंतप्रधान ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ला हिरवा झेंडा दाखविणार

Samruddhi Mahamarg: ‘समृद्धी’च्या दिशेने आज मोठी झेप; पंतप्रधान ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ला हिरवा झेंडा दाखविणार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे रविवारी नागपुरात आगमन होत असून, नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे त्यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. तसेच नागपूर- बिलासपूर ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ला ते हिरवा झेंडा दाखवतील. यासह विविध प्रकल्पांची पायाभरणी व लोकार्पणही त्यांच्या हस्ते होईल. 

पंतप्रधान रस्ते मार्गाने ९.४० वाजता नागपूर रेल्वे स्टेशनवर पोहोचतील.  ते  ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ला हिरवी झेंडी दाखवतील. यानंतर मेट्रो फ्रिडम पार्क स्टेशनमधील प्रदर्शनीची पाहणी करून खापरी मेट्रो स्थानकापर्यंत मेट्रोतून प्रवास करतील. तेथे  ते ‘नागपूर मेट्रो टप्पा १’ राष्ट्राला समर्पित करतील. ‘नागपूर मेट्रो टप्पा -२’ची पायाभरणीही त्यांच्या हस्ते होईल. यानंतर सकाळी १०.४५ वाजता समृद्धी महामार्गाच्या झिरो पॉईंटवर समृद्धीच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण करतील व महामार्गाचा दौरा करतील. ११.१५ वाजता त्यांच्या हस्ते  एम्स नागपूरचे राष्ट्रार्पण होईल. ११.३० वाजता टेम्पल मैदानावर जाहीर कार्यक्रमात ते मार्गदर्शन करतील. 

समृद्धी महामार्गाला ‘ॲफकॉन्स’मुळे गालबोट
समृद्धी महामार्गाच्या बांधकामासाठी मुरुम काढण्याकरिता ॲफकॉन्स कंपनीने अवैधरीत्या शेकडो एकर शेती खोदून काढली. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, शेतकऱ्यांमध्ये या कंपनीविरोधात संतापाची लाट पसरली आहे. यासोबतच कंत्राटदाराने नद्याही खोदल्या असून पर्यावरणाची मोठी हानी केली आहे. ॲफकॉन्स कंपनीने या महामार्गासाठी मोठ्या प्रमाणात गौण खनिजांचे उत्खनन केले. उत्खननासाठी एका खसऱ्याची परवानगी घेतली व त्या आधारावर आजूबाजूची शेकडो एकर जमीन खोदून काढल्याचे प्रकार समोर आले आहेत. 

नागपूर मेट्रो : ‘नागपूर मेट्रोचा पहिला टप्पा’ पंतप्रधान राष्ट्राला समर्पित करणार आहेत.  खापरी मेट्रो स्थानकावरून पंतप्रधान  खापरी ते ऑटोमोटिव्ह स्क्वेअर (ऑरेंज लाइन) आणि प्रजापती नगर ते लोकमान्य नगर (एक्वा लाइन) या दोन मेट्रो रेल्वेला  हिरवा झेंडा दाखवतील.  ६७०० कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या माध्यमातून विकसित होणाऱ्या नागपूर मेट्रो टप्पा-२ ची पायाभरणीही पंतप्रधान करणार आहेत.

एम्स नागपूर : एम्स नागपूरच्या राष्ट्रार्पणाच्या माध्यमातून देशभरातील आरोग्य पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठीची  पंतप्रधानांची वचनबद्धता मजबूत केली जाईल. जुलै २०१७ मध्ये पंतप्रधानांनीच याची पायाभरणी केली होती. रुग्णालयाची स्थापना प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना या केंद्रीय क्षेत्रातील योजनेअंतर्गत करण्यात आली आहे.

Web Title: Prime Minister Narendra Modi will flag off Vande Bharat Express and Nagpur-Mumbai Samruddhi Expressway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.