पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच इस्त्रायलला भेट देणार - वाणिज्यदूत डेविड अकोव
By Admin | Published: March 4, 2016 04:13 PM2016-03-04T16:13:33+5:302016-03-04T17:36:33+5:30
इस्त्राएलचे भारतातील वाणिज्यदूत डेव्हीड अकोव आणि उपवाणिज्यदूत निमरोद असुलिन यांनी शुक्रवारी लोकमतच्या मुंबई कार्यालयाला सदिच्छा भेट दिली
>
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ४ - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी याच वर्षी इस्त्रायलला भेट देतील अशी माहिती इस्त्रायलचे काउन्सुल जनरल डेविड अकोव यांनी लोकमतशी बोलताना दिली आहे. गेल्या वर्षी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी आणि परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी इस्त्रायलला भेट दिली. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही इस्त्रायलचा दौरा केला आणि भारत-इस्त्रायल तसेच महाराष्ट्र-इस्त्रायल संबंध दृढ होत असल्याचे संकेत मिळाले. त्याच सुमारास इस्त्रायलला भेट देणारे पहिले पंतप्रधान नरेंद्र मोदी असतिल असेही संकेत केंद्र सरकारने दिले. मात्र, अद्याप त्यांचा दौरा कधी होणार याबाबत संदिग्धता राहिली आहे.
पंतप्रधान मोदी इस्त्रायलला भेट देतील यासंदर्भात बोलणी सुरू असून लवकरच, म्हणजे याच वर्षात ही भेट होईल असे अकोव म्हणाले. कृषीपासून सुरक्षेपर्यंत अनेक क्षेत्रांमध्ये भारत व इस्त्रायल यांच्यामध्ये सहकार्य होण्यास वाव असून गेल्या काही वर्षांमध्ये त्यादृष्टीने सकारात्मक पावले पडली असल्याचे त्यांनी सांगितले.
इस्त्राएलचे भारतातील वाणिज्यदूत डेव्हीड अकोव आणि उपवाणिज्यदूत निमरोद असुलिन यांनी शुक्रवारी लोकमतच्या मुंबई कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी लोकमत समूहाच्या संपादकीय मंडळासोबत त्यांनी भारत-इस्त्राएल संबंध आणि महाराष्ट्र-इस्त्रायल संबंध याची विस्तृत चर्चा केली.
"इस्त्रायल हा तंत्रज्ञानात आघाडीवर आहे. उत्पादन क्षेत्रात आघाडी घेऊ इच्छिणाऱ्या भारतीय ब़ड्या कंपन्या व कुठल्याही विशिष्ट समस्येवर तोडगा काढणारं इस्त्रायली तंत्रज्ञान यांचा मिलाफ दोन्ही देशांच्या हिताचा आहे. येत्या काळामध्ये कृषीपासून ते वाहन निर्मितीपर्यंतच्या अनेक क्षेत्रांमध्ये भारतीय बड्या कंपन्या व इस्त्रायली तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्या यांच्यामध्ये सहकार्य बघायला मिळेल." असे वाणिज्यदूत डेविड अकोव यांनी सांगितले.