पंतप्रधानांनी आता दुसरी मागणी मान्य करावी - अण्णा हजारे
By admin | Published: November 9, 2016 04:46 PM2016-11-09T16:46:50+5:302016-11-09T16:46:50+5:30
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे
Next
ऑनलाइन लोकमत
अहमदनगर, दि. 9 - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. 'पंतप्रधान मोदींनी घेतलेला निर्णय हा क्रांतीकारक आहे. त्याबाबात त्यांचे अभिनंदन करायला हवे. मोदींनी टाकलेले पाऊल हे चांगले असून त्यामुळे काळा पैसा बाहेर येईल, आणि देशाची प्रगती होईल',असे सांगत अण्णा हजारे यांनी मोदींचे कौतुक केले आहे.
याआधी आम्ही देशहितासाठी 500 आणि हजार रुपयांच्या नोटांवर बंदी घाला, अशी मागणी केली होती, असंदेखील अण्णांनी यावेळी नमूद केले. या पार्श्वभूमीवर अण्णा हजारे यांनी मोदींना आता दुसरी मागणी मान्य करायलादेखील सांगितले आहे. सर्व राजकीय पक्षांच्या देगणीचे ऑडीट करावे, अशी मागणी हजारे यांनी पंतप्रधानांकडे केली आहे. राजकीय पक्ष 20 हजारवरील हिशेब देत नाही, देणग्यांचे 20 हजाराचे टप्पे करुन, बनावट नावे देऊन काळा पैसा पांढरा करतात. निवडणूक आयोगाने या देणग्यांचं स्पेशल ऑडीट करावं, अशी मागणी अण्णा हजारे यांनी केली आहे.
दोन हजार नोटांत गडबड होण्याची शक्यता आहे, हा व्यवहार गरीब करत नाही, त्यामुळे पुन्हा काळा पैसा तयार होण्याची शक्यता आहे, यावर पुन्हा विचाराची करण्याची गरज असल्याचेही अण्णांनी सांगितले आहे. दोन हजार रुपयांपर्यंतचे आर्थिक व्यवहार रोख करावे त्यावरील व्यवहार चेकद्वारे करावे. त्यामुळे काळ्या पैशाला ब्रेक लागेल, असे मत अण्णांनी व्यक्त केले आहे.