देवेंद्र फडणवीस केंद्रात जाण्यासंबंधी पंतप्रधान निर्णय घेतील- नितीन गडकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 07:46 PM2017-08-25T19:46:44+5:302017-08-25T19:48:55+5:30
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रात चांगले काम करीत आहेत. सध्यस्थितीत राज्यातील आव्हाने व समस्या बघता त्यांची येथे आवश्यकता आहे
नागपूर, दि. 25 - राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रात चांगले काम करीत आहेत. सध्यस्थितीत राज्यातील आव्हाने व समस्या बघता त्यांची येथे आवश्यकता आहे. त्यांना केंद्रीय मंत्रीमंडळात समाविष्ट करायचे का, यावर विचार विनिमय करून याबाबतचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी घेतील, असे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले.
गडकरी यांच्या महालातील वाड्यावर गणरायाची स्थापना करण्यात आली. गणेशपूजनानंतर गडकरी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. रेल्वे मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी आपल्याकडे सोपविण्याच्या हालचाली सुरू आहेत का, अशी विचारणा केली असता ते म्हणाले, माझ्याकडे भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्रालय आहे.
या विभागांमध्ये मी पूर्णपणे समाधानी आहे. या दोन मंत्रालयात बरीच आव्हाने आहेत. बरेच काम करणे बाकी आहे. रेल्वे मंत्रालय आपल्याकडे सोपविणार असल्याच्या बातम्या मी प्रसार माध्यमांद्वारे ऐकल्या आहेत. अमेरिकेत एक इन्फ्रास्ट्रक्चर विभाग आहे. त्या अंतर्गत रेल्वे, नागरी उड्डयण,जल, रस्ते वाहतूक हे सर्व विभाग येतात. काही देशांमध्ये ही व्यवस्था वेगवेगळी आहे. कुणाकडे कोणते मंत्रालय द्यायचे, कोणते विभाग एकत्र करायचे हा पूर्ण अधिकार पंतप्रधानांचा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
देशाला सुखशांती लाभो
- गडकरी यांनी आपल्या कुटुंबियांसह घरी गणरायाची स्थापना केली. विधिवत पूजा केली. गणरायाने देशातील प्रत्येकाला सुख शांती प्रदान करावी, अशी प्रार्थना त्यांनी केली. गडकरी म्हणाले, श्रीगणेश हे विद्येचे दैवत आहे. येत्या काळात ज्ञान, विज्ञानाचा उपयोग करून देशाचे प्रगती करावी. भिती, अवर्षण, भ्रष्टाचारातून देश मुक्त होवो व ज्ञानाचा वापर करून भारताचे नवनिर्माण होवो, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.