शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची पवारांची पंतप्रधानांकडे मागणी
By admin | Published: March 15, 2017 05:09 PM2017-03-15T17:09:52+5:302017-03-15T17:39:30+5:30
शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विधिमंडळात रणकंदन सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 15 - राज्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विधिमंडळात रणकंदन सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. यावेळी शरद पवार आणि पंतप्रधान मोदी यांच्यात महाराष्ट्रातील विविध प्रश्नांवर सुमारे 20 मिनिटे चर्चा झाली. या चर्चेदरम्यान कर्जाच्या ओझ्याने थकून गेलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, अशी मागणी शरद पवार यांनी पंतप्रधानांकजे केली.
राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधकांबरोबरच सत्ताधारी शिवसेनेनेही सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतल्याने सत्ताधारी भाजपा सरकारची गोची झाली आहे. मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून थेट पंतप्रधानांचीच भेट घेत कर्जमाफीची मागणी शरद पवार यांनी सर्व विरोधी पक्षांना एकप्रकारे धोबीपछाड दिला आहे. आता पवार यांच्या मागणीला मोदी कशा प्रकारे प्रतिसाद देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
दरम्यान, उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीत भाजपाने मिळवलेले घवघवीत यश आणि पाच पैकी चार राज्यात भाजपाने स्थापन केलेले सरकार या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्याने दिल्लीतील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. परवाच एका कार्यक्रमात शरद पवार यांनी केंद्र सरकारने कॅशलेला दिलेल्या प्रोत्साहनाचे शरद पवार यांनी कौतुक केले होते. त्यामुळे महाराष्ट्राचेही लक्ष या भेटीती सविस्तर तपशीलाकडे लागले आहे.